दिलासादायक! सोलापूर जिल्ह्यात 'हे' तीन तालुके कोरोनामुक; ग्रामीण भागातुन कोरोना हद्दपार होणार
सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण जगाला वेठीस धरणारा कोरोना मार्च 2022 मध्ये परतीच्या वाटेवर आहे. दिलासादायक बाब म्हणजे दोन्ही लाटांमध्ये जिल्हा प्रशासनाची चिंता वाढविणारा माळशिरस तालुका आता कोरोनामुक्त झाला आहे. दुसरीकडे दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापूर हे तालुके यापूर्वीच कोरोनामुक्त झाले आहेत. माळशिरस तालुक्यात आतापर्यंत 35 हजार 542 जणांना कोरोनाची बाधा झाली होती आणि त्यातील 508 रुग्णांचा मृत्यू झाला.
तर दक्षिण सोलापूर तालुक्यातील चार हजार 558 रुग्णांपैकी 183 जणांचा आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील तीन हजार 352 रुग्णांपैकी 163 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. आता हे तिन्ही तालुके कोरोनामुक्त झाले आहेत. मार्च महिन्यात आतापर्यंत शहरात सात तर ग्रामीणमध्ये 94 रुग्ण वाढले आहेत. तर शहर-ग्रामीणमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा कोरोनाने बळी घेतला आहे.
पण, कोरोना संशयितांच्या चाचण्यांमध्ये पॉझिटिव्ह येणाऱ्यांची संख्या अत्यल्प आहे. शुक्रवारी (ता. 11) शहरात 433 संशयितांमध्ये एकही पॉझिटिव्ह आढळला नाही. तर ग्रामीणमध्ये 438 संशयितांमध्ये चारजण पॉझिटिव्ह आढळले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे मागील महिनाभरात म्युकरमायकोसिसचा एकही रुग्ण आढळलेला नाही. आता अक्कलकोट तालुकाही कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर असून तालुक्यात केवळ एक सक्रिय रुग्ण आहे.
दुसरीकडे सांगोल्यातील तीन, बार्शी, मंगळवेढ्यातील प्रत्येकी चार, मोहोळ तालुक्यातील पाच, पंढरपूर तालुक्यातील सहा, करमाळा तालुक्यातील आठ आणि माढा तालुक्यातील 13 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. शहरातील बहुतेक प्रभाग कोरोनामुक्त झाले असून प्रतिबंधित लसीमुळे हा सकारात्मक परिणाम पहायला मिळतोय, असे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्ह्यातील 30 लाख 87 हजार व्यक्तींनी प्रतिबंधित लसीचा पहिला डोस घेतला असून त्यापैकी 21 लाख 59 हजार 504 जणांनी दोन्ही डोस टोचून घेतले आहेत.
मार्चमध्ये 101 बाधित तर दोघांचा मृत्यू
जिल्ह्यातील दोन लाख 19 हजार 684 जण आतापर्यंत कोरोना बाधित आढळले. त्यापैकी पाच हजार 230 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या शहरात पाच तर ग्रामीणमध्ये 44 सक्रिय रुग्ण आहेत. उर्वरित रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे 1 ते 11 मार्च या काळात शहरात अवघे सात तर ग्रामीणमध्ये 94 रुग्ण वाढले आहेत. शहर-ग्रामीणमधील प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या दोन्ही लाटांमध्ये अशी दिलासादायक स्थिती कधीच नव्हती, हे विशेष.

0 Comments