कोरोनाच्या चौथ्या लाटेचा व्यक्त होऊ लागला अंदाज !
नवी दिल्ली : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला पूर्ण निरोप देण्याआधीच पुन्हा चौथ्या लाटेची चर्चा सुरु झाली असून भारतात लवकरच चौथी लाट येण्याचा अंदाज व्यक्त करीत तज्ञांनी तारीख देखील दिली आहे त्यामुळे पुन्हा चिंतेचे ढग जमा होऊ लागले आहेत.
गेल्या दोन वर्षापासून कोरोना आणि चिंता यातच सगळे गुरफटून गेले असून कधीही न भरून येणारे नुकसान कोरोनाने केलेले आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेने मोठा विध्वंस केला असताना तिसऱ्या लाटेची चर्चा सुरु झाली होती. तिसरी लाट येणार की नाही याबाबत अभ्यासकांत मतभेद होते परंतु तिसरी लाट चोरपावलाने आली आणि पुन्हा घबराट निर्माण केली होती. सुदैवाने पहिल्या दोन्ही लाटांच्या तुलनेत तिसरी लाट विशेष प्रभावी ठरली नाही आणि वेगाने ती परतीच्या मार्गाला लागली. कोरोना संपुष्टात आल्याची अनेकांची भावना झाली आहे परंतु तसे नसल्याचे आधीपासूनच सांगितले जात आहे. अशा परिस्थितीत चौथ्या लाटेची चर्चा सुरु झाल्याने पुन्हा चिंतेचे ढग जमू लागले आहेत.
शास्त्रज्ञांचा अंदाज
भारतात कोरोनाची चौथी लाट लवकरच येईल अशा प्रकारचा अंदाज आता कोरोना अभ्यासक आणि शास्त्रज्ञांनी व्यक्त केलेला आहे. कानपूर आयआयटी शास्त्रज्ञांनी याबाबत इशाराही दिला आहे कोरोनाची चौथी लाट २२ जून पर्यंत भारतात येईल आणि या लाटेचा प्रभाव २४ ऑक्टोबर पर्यंत राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. चार महिने स्थिरावणार असलेल्या या लाटेत १५ ते ३१ ऑगष्ट या दरम्यान कोरोना रुग्णांची सर्वाधिक वाढ असेल परंतु कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटचा रुग्णांवर किती आणि कसा प्रभाव असेल हे मात्र लसीकरणावर अवलंबून असणार आहे असे देखील सांगण्यात आले आहे.
दाव्याची सत्यता
कोरोनाची तिसरी लाट येण्यापूर्वी काही तज्ज्ञांनी तिसरी लाट येणार नाही असे ठामपणे सांगितले होते तर काहींनी ही लाट येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला होता. कानपूर आयआयटी तज्ज्ञांनी कोरोनाच्या संदर्भात आजवर जेवढे अंदाज व्यक्त केले आहेत त्यातील बहुतेक अंदाज सत्यात उतरले आहेत. फेब्रुवारीमध्ये कोरोनाची तिसरी लाट येईल आणि त्यानंतर रुग्णांची वाढ कमी कमी होत जाईल असा अंदाज याच तज्ज्ञांनी डिसेंबर २०२१ मध्येच व्यक्त केला होता आणि तो सत्यात उतरला. आता त्याच तज्ज्ञांनी चौथ्या लाटेबाबत अंदाज व्यक्त केला असल्याने कोरोनाचे संकट अद्याप संपलेले नाही हेच दिसत असून याकडे गंभीरपणे पहावे लागणार आहे.
चीन पुन्हा हादरले !
चीनमध्ये पुन्हा एकाएकी कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत असून या आकडेवारीमुळे जगातील अनेक देश चिंतेत आहेत. चीनच्या आकडेवारीची तुलना करून काही अभ्यासक अभ्यास करीत आहेत. हे वाढते आकडे पाहून भारतात देखील चिंता व्यक्त होऊ लागली आहे परंतु हैद्राबाद येथील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राध्यापक आणि राष्ट्रीय कोविड सुपर मॉडेल समितीचे प्रमुख डॉ. विद्यासागर यांनी मात्र चीनच्या आकडेवारीकडे दुर्लक्ष करण्यास सांगितले आहे. चीनच्या आकड्यांशी तुलना न करण्याची सूचना त्यांनी केली आहे.
तुलना नकोच कारण --
चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी त्यांच्या वाढत्या संख्येशी भारतातील सद्य परिस्थितीशी तुलना करता येणार नाही. चीनमध्ये कोरोनाच्या केसेस नोंद करण्याची पद्धत वेगळी असून तेथे शून्य कोरोना धोरण असून तेथील नियम देखील अत्यंत कडक आहेत. काही हजार रुग्ण आढळले तरी चीन हा मुद्दा मोठ्या प्रभावाने मांडत असते असे डॉ. एम. विद्यासागर यांनी म्हटले आहे.
भारतात कमी प्रभाव !
डेल्टा व्हेरिएंट लाटेच्या वेळी प्रसार रोखण्यात चीन यशस्वी झाला होता पण जगातील अन्य देशात तसेच घडेल असे वाटत नाही, भारतात आता कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे आणि तसं घडलं तरी त्याचा प्रभाव अत्यंत कमी असणार आहे. कोरोनाच्या संकटांची फेज संपल्याच्या स्टेजवर भारत आला असून सद्य परिस्थितीवर लक्ष ठेवत पुन्हा सामान्य जीवनाला सुरुवात केली पाहिजे असे देखील विद्यासागर यांनी म्हटले आहे.

0 Comments