google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पंढरपूर पोलिसांनी केले 'त्या' पोलीस अधिकाऱ्यास अटक !

Breaking News

पंढरपूर पोलिसांनी केले 'त्या' पोलीस अधिकाऱ्यास अटक !

 पंढरपूर पोलिसांनी केले 'त्या' पोलीस अधिकाऱ्यास अटक !

पंढरपूर : पोलीस उपनिरीक्षक असल्याचे भासवून पोलीसात भरती होऊ इच्छिणाऱ्या एका तरुणीची फसवणूक करणाऱ्या एका भामट्या तरुणास  पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 


पोलीस असल्याची बतावणी करून नागरिकांना लुटण्याचा प्रकार अधूनमधून होत असतो.  (Pandharpur Crime) पंढरपूर शहरात एका महिलेचे दागिने असेच लुटण्यात आले होते तर खर्डी यथे देखील अशा प्रकारे लुटमार करण्यात आली आहे. पंढरपूर शहर पोलिसांनी मात्र एका नकली आणि तोतया पोलीस उपनिरीक्षकास त्याच्या नकली गणवेषासह पकडले असून हा एक चर्चेचा विषय बनला आहे. आपण मंगळवेढा येथे पोलीस उपनिरीक्षक असून आपले वडील देखील आयपीएस अधिकारी आहेत अशी बतावणी करीत रमेश भोसले नावाच्या एका तरुणाने पोलीसात भरती होऊ इच्छिणाऱ्या एका तरुणीची फसवणूक  केली पण या तरुणीने त्याला तुरुंगाची वारी घडवली आहे. 


पंढरपूर येथील एक तरुणी पोलीस भरतीच्या प्रयत्नात होती आणि या दरम्यान या तरुणीचा परिचय रमेश भोसले नावाच्या एका तरुणाशी झाला. 'आपण पोलीस उपनिरीक्षक असून आपले वडील आयपीएस पोलीस अधिकारी आहेत' अशी बतावणी या भोसलेने केली आणि 'पोलीस भरतीसाठी  तुला मदत करतो' असे देखील त्याने त्या तरुणीस सांगितले.  हळूहळू या भामट्याने त्या तरुणीशी आणि तिच्या घराच्या लोकांशी संपर्क वाढवला. आपला अनेक मोठ्या अधिकाऱ्यांशी संपर्क असल्याचे भासवत त्याने तरुणीच्या घराच्या माणसाना भूलथापा दिल्या आणि त्यांना लग्नासाठी देखील तयार केले. 


म्हणून घेतला गणवेश !

सदर तरुणी आणि तिच्या कुटुंबाच्या संपर्कात हा रमेश भोसले गेल्या सहा महिन्यापासून होता आणि आपण पोलीस उपनिरीक्षक आहोत याची त्यांना खात्री पटावी यासाठी त्याने पोलीस अधिकाऱ्याचा गणवेश देखील खरेदी केला. पोलीस उपनिरीक्षक असल्याचे बनावट ओळखपत्र आणि बनावट आधार कार्ड देखील पट्ठ्याने बनवून घेतले आणि ते दाखवत सदर तरुणी आणि तिच्या कुटुंबाची दिशाभूल करीत राहिला. पंढरपूर तालुक्यातील आंबे गावाचा हा रमेश भोसले या कुटुंबाची दिशाभूल, फसवणूक तर करीत राहिलाच पण त्याने थेट आपण मंगळवेढा पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक आहे असे सांगून टाकले. 


लग्नासाठी वाट्टेल ते !

काही महिने सदर तरुणी आणि तिच्या कुटुंबाच्या संपर्कात राहिलेल्या रमेश भोसले याला उपनिरीक्षक असायचे भासवत सदर तरुणीशी लग्न करायचे होते त्यामुळे तो सारखा लग्नाचा विषय पुढे रेटत होता. तरुणीशी लग्न करण्याची घाई त्याला झाली होती.


 रमेश भोसले याने कितीही सोंग आणले तरी तरुणी त्याला बदली नाही उलट त्याच्या वागण्याचा संशय या तरुणीला आला आणि तिने पंढरपूर तसेच मंगळवेढा पोलीस ठाण्याकडे चौकशी केली. या चौकशीनंतर मात्र तिला मोठा धक्का बसला. रमेश  भोसले नावाचा कुणी पोलीस उपनिरीक्षक नसल्याची माहिती या तरुणीला मिळाली. 


पकडण्याचा प्लॅन !

नकली आणि भामटा तरुण पोलीस उपनिरीक्षक असल्याचे भासवत आपली आणि आपल्या कुटुंबाची फसवणूक करीत असल्याचे या तरुणीच्या लक्षात आले आणि तिने थेट पंढरपूर पोलिसांच्या निर्भय पथकाशी संपर्क साधला.  पोलिसांनी या कथित पोलीस अधिकाऱ्याच्या मुसक्या आवळण्याचा प्लॅन केला.


 पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करणाऱ्या त्या रमेश भोसले या तरुणाला बोलावून घेऊन त्याला बोलण्यात गुंतविण्याचा सल्ला पोलिसांनी  या तरुणीला दिला. त्यानुसार सदर तरुणीने त्याला बोलावून घेतले आणि त्याच्याशी बोलत थांबली. याचवेळी पोलीस तेथे पोहोचले आणि त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली. 


आवळल्या मुसक्या !

पंढरपूर तालुक्यातील आंबे येथील २२ वर्षे वयाचा तरुण रमेश सुरेश भोसले (भिसे) याला ताब्यात घेऊन पोलिस चौकशी करीत असता त्याच्याजवळ असलेली बॅग तपासली. यावेळी त्याच्या या बॅगेत खाकी रंगाचा गणवेश, बेल्ट, खेळण्यातील पिस्तूल, बनावट ओळखपत्र आणि बनावट आधारकार्ड पोलिसांना मिळून आले.  याबाबत पोलिसांनी त्याला विचारले असता त्याची बोलती बंद झाली.


 भामटेगिरी करणाऱ्या या तरुणास काहीही उत्तर देता येत नव्हते. अखेर त्याने थेट कबुलीच देऊन टाकली आणि पोलिसांनी सदर तरुणीच्या फिर्यादीवरून रमेश भोसले या नकली पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक म्हणून स्वतःची ओळख करून देत असलेल्या या तरुणास पोलिसांनी अटक केली  आणि त्याची रवानगी तुरुंगात केली.

Post a Comment

0 Comments