“या” दिग्गज व ज्येष्ठ अभिनेत्रीचे निधन!
मुंबई: मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री वत्सला देशमुख (वय-९२) यांचे आज निधन झाले. प्रसिद्ध अभिनेत्री रंजना देशमुख यांच्या त्या आई होत्या.प्रचंड गाजलेला मराठी चित्रपट पिंजरा मध्ये वत्सला देशमुख यांनी भूमिका साकारली होती.
या चित्रपटातील त्यांचे संवाद देखील मोठ्या प्रमाणात गाजले होते. याशिवाय अनेक चित्रपटांमध्ये वत्सला देशमुख यांनी प्रमुख अभिनेत्री व सहाय्यक अभिनेत्री म्हणून भूमिका साकारल्या आहेत. याव्यतिरिक्त आई, मावशी, काकू, आत्या, आजी अशा अनेक भूमिका देखील त्यांनी निभावलेल्या आहेत.
“वत्सला देशमुख ह्या सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री रंजना देशमुख हिच्या आई होत्या. त्यांनी आपल्या कामाची सुरुवात हिंदी चित्रपट तुफान और दिया या चित्रपटातून केली होती. मग त्यांचे फायर, नागपंचमी, जल बिन मच्छली नृत्य, बिन बिजली असे अनेक चित्रपट त्यावेळी गाजलेले होते.
पण त्यांना सुहाग ह्या चित्रपटातून मोठ्या प्रमाणात ओळख मिळाली होती व त्यांचे नाव घरोघरी पोहचले होते. त्यानंतर त्यांनी पिंजरा आणि नवरंग चित्रपटात काम केले होते. अशा दिग्गज अभिनेत्री च्या जाण्याने चित्रपट क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली असून महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.” असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमेय खोपकर यांनी फेसबुकवर पोस्ट करून वत्सला देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

0 Comments