निर्दयी बापाचे कृत्य, भांडण लेकराच्या जीवावर;मुलीलाच पुरले जिवंत खड्ड्यात!
नवरा बायकोची भांडणे कुठल्या स्तराला जातील काही नेम नाही. मात्र या भांडणांचा बऱ्याचदा धक्कादायक शेवट होतो. अशीच एक धक्कादायक घटना वाशिममध्ये समोर आली आहे. एका निर्दयी बापाने आपल्या एका वर्षाच्या चिमुकलीला जिवंत खड्ड्यात पुरल्याची घटना काल संध्याकाळच्या दरम्यान उघडकीस आली. या घटनेत चिमुकलीचा मृत्यू झाला.
सुरेश घुगे वय सत्तावीस वर्ष असे निर्दयी पित्याचे नाव असून पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रिसोड तालुक्यातील सुरेश घुगे हा आपल्या पत्नी कावेरी सोबत वाडी वाकद शेतशिवारातील गोठ्यावर राहतो. आरोपीला तीन मुली आहेत.
सुरेश हा नेहमी पत्नी कावेरीच्या चरित्रावर संशय घ्यायचा. यातून दोघांची नेहमी भांडणे व्हायची. सुरेशला दारूचे व्यसन जडले. काल दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले, या भांडणात सुरेशने आपल्या पत्नीला बेदम मारहाण केली. कावेरी आपला जीव वाचवण्यासाठी गावाकडे धावत गेली. तिने आपल्या दीराला हकिकत सांगितली.
यानंतर काही माणसे शेताकडे गेली असता चिमुकली दिसत नसल्याने त्यांनी सुरेशला विचारणा केली. त्यानंतर त्याने हकीकत सांगितली. त्यानंतर मुलीचे प्रेत उकरून बाहेर काढले. नंतर याबाबतची सूचना रिसोड पोलिसांना दिली. रिसोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार देवेंद्रसिंह ठाकूर यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. आरोपी सुरेश यास अटक केली आहे.

0 Comments