शेकापच्या विराट मोर्चाने विरोधकांना धडकी शेतकरी कामगार पक्षाचा भव्य मोर्चा
स्व. भाई गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर प्रथमच सांगोला तहसील कार्यालयावर शेतकरी कामगार पक्षाचा विराट मोर्चा निघाला. ५० हजारांहून अधिक कार्यकर्ते या मोर्चात सहभागी आहेत.
शेतकरी कामगार पक्षाचे नेते स्व. भाई गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर प्रथमच सांगोला तहसील कार्यालयावर शेतकरी कामगार पक्षाचा विराट मोर्चा निघाला. ५० हजारांहून अधिक कार्यकर्ते या मोर्चात सहभागी आहेत. स्व. गणपतराव देशमुख यांच्या पश्चातही त्याच ताकदीने विरोधकांना धडकी भरवणारा हा मोर्चा निघाला.
सकाळी महात्मा फुले चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. तालुक्यातील विविध गावांतून पाचशेहून अधिक दुचाकी या मोर्चात सहभागी झाल्या. अनेक गावातून वाहने करून मोर्चेकरी सामील झाले होते.
घोषणांनी शहर दुमदुमले
सांगोल्यात 14 मार्च रोजी शेतकरी कष्टकरी जनतेच्या प्रश्नासाठी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. आघाडी सरकारचा निषेध असो, महावितरणचा निषेध असो, शेकाप झिंदाबाद च्या घोषणा देत विराट मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. तेथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. नेत्यांची भाषणे झाली.
यावेळी चंद्रकांत देशमुख, शेकापचे युवक नेते तथा पुरोगामी युवक संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख, डॉ. अनिकेत देशमुख,राज्य चिटणीस बाबासाहेब करांडे,जिल्हा परिषद सदस्य ॲड.सचिन देशमुख, सूतगिरणी चेअरमन नानासो लिगाडे, सभापती राणीताई कोळवले, माजी सभापती बाळासाहेब काटकर, विठ्ठल शिंदे, तालुका चिटणीस दादासाहेब बाबर, विजय शिंदे, नंदू शिंदे, नारायण जगताप, ॲड. मारुती ढाळे, विलास सरगर,तानाजी चंदनशिवे, संतोष देवकते,विष्णू देशमुख,तुकाराम भूसनर, यांच्यासह तालुक्यातील सर्वच गावातील प्रमुख पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब झाले आक्रमक
मोर्चेकऱ्यांनी संबोधित करताना शेकापचे युवक नेते तथा पुरोगामी युवक संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख म्हणाले की, सध्याचे महाविकास आघाडी सरकार हे शेतकऱ्याच्या विरोधी आहे. त्यांना शेतकऱ्यांचे खरे दुखणेच समजले नाही. आज सांगोला तालुक्यातील शेतकरी पूर्णपणे नागावला आहे. त्यामुळे शेतकरी, कष्टकरी जनतेचा हा पक्ष त्यांना जाब विचारून, वेळप्रसंगी मंत्रालयावरही मोर्चा काढल्याशिवाय गप्प बसणार नाहीत.
सांगोला तालुक्यातील शेतीच्या पाण्याच्या योजना स्व. आबासाहेबांनी मार्गी लावल्याने सांगोला तालुक्यात हे पाणी आले आहे. सध्या पाणी योजनांची जी कामे आहेत तीही आम्हीच पूर्ण करणार आहोत. 2014 पासून शेतकऱ्यांना वीजबिले आली नाहीत. आता जी बिले दिलेली आहेत ती पूर्णपणे चुकीची आहेत. चारा छावण्याची बिलेही दिलेली नाहीत. हा अन्याय सहन होणार नाही.
यावेळी चंद्रकांत देशमुख, डॉ. अनिकेत देशमुख, ॲड. सचिन देशमुख,विजय शिंदे यांनी विचार व्यक्त केले.

0 Comments