अर्थसंकल्पात सांगोला विधानसभा मतदारसंघासाठी मिळाला ९१ कोटी ५० लाखांचा सर्वाधिक निधी - आमदार शहाजीबापू पाटील
सांगोला उपसा सिंचन योजना, नवीन प्रशासकीय इमारत, रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागणार
सांगोला (प्रतिनिधी): २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघात विकास कामांचा धडाका लावला आहे. सांगोला तालुक्यातील अपूर्ण कामे पाच वर्षात पूर्ण करण्याची मतदारांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी आमदार शहाजीबापू पाटील प्रयत्नशिल आहेत. चालू अर्थसंकल्पात सांगोला तालुक्याला सुमारे ९१ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून यातून सांगोला उपसा सिंचन योजना, नवीन प्रशासकीय इमारत व रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे आमदार शहाजीबापूपाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
यावेळी बोलताना आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले, सांगोला तालुक्याचा सर्वांगीण विकास हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून मी काम करत आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मतदारांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी मी सदैव तत्पर राहणार असून सांगोला विधानसभा मतदारसंघातील विकास कामांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे.
चालू अर्थसंकल्पात सांगोला तालुक्याला झुकते माप मिळाले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघातील विशेष रस्ते दुरुस्तीसाठी १० कोटी, प्रमुख जिल्हा मार्ग व राज्यमार्ग या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी १५ कोटी ५० लाख रुपये, नवीन प्रशासकीय इमारतीसाठी १५ कोटी, जिल्हा परिषदेकडील इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी १६ कोटी ५० लाख, नवीन पाणंद रस्त्यांसाठी १४ कोटी ५० लाख रुपये असा ७१ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तसेच या अर्थसंकल्पात सांगोला तालुक्यातील शेतीच्या पाण्यापासून वंचित असलेल्या १४ गावातील जनतेला मोठा दिलासा मिळाला असून गेल्या २३ वर्षापासून उजनीच्या दोन टीएमसी पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या सांगोला उपसा सिंचन योजनेला २० कोटी रुपयांचा निधी प्रथमच मंजूर झाला आहे. त्यामूळे लवकरच सांगोला उपसा सिंचन योजनेचे काम सुरू होणार असल्याने बळीराजा सुखावला आहे.
चालू अर्थसंकल्पात सांगोला तालुक्याला महाविकास आघाडी सरकारने सुमारे ९१ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. येत्या दोन वर्षात सांगोला तालुक्यातील सर्वच विकासकामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. सांगोला तालुक्याचा सर्वांगीण विकास, सर्वसामान्य जनतेची प्रगती आणि शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून नवीन विकास कामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

0 Comments