कोल्हापूर : महावितरणने दिलेले एका लाखाचे चुकीचे वीज बिल दुरुस्त केल्यानंतर केवळ दोन हजाराचे झाले असून या प्रकारामुळे वीज वितरण कंपनीकडून कशा प्रकारे चुकीची बिले देवून शेतकऱ्यावर अन्याय केला आहे हेच समोर आले आहे. एखाद्या व्यक्तीने काही काम व्यवस्थित केले नसेल तर त्याला 'लाखाचे बारा हजार करणे' अशी म्हण प्रचलित आहे पण येथे तर वसुलीचा तगादा लावणाऱ्या आणि शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांची पर्वा न करणाऱ्या महावितरणने ' लाखाचे दोन हजार' केले असल्याचे समोर आले आहे. महावितरण एकीकडे वीज तोडण्याची कारवाई करीत होते तर दुसरीकडे शेतकरी वीज बिल अवाजवी आल्याचे सांगत होते. जादा आलेले बिल दुरुस्त करून देण्याची मागणी करीत असताना ' आधी बिल भर मग दुरुस्तीचे पाहू' असे सांगून शेतकऱ्यांना अधिकच अडचणीत आणले जात होते. आपले काही चुकतच नाही हा महावितरणचा अविर्भाव अनेक शेतकऱ्यांची कोंडी करून टाकणारा होता आणि त्यामुळे वीज बिल न भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढताना दिसत होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या या सगळ्याच अडचणी शासन दरबारी आक्रमकपणे मांडल्या तेंव्हा कुठे महावितरण सरळ झाले आणि त्यांनी राज्यात प्रत्येक तालुक्यात वीज बिल दुरुस्ती शिबिरांचे आयोजन केले. अशाच शिबिरात कागल येथे एका शेतकऱ्याला आलेले बिल दुरुस्त करून देण्यात आले आणि एक लाखाचे बिल दुरुस्त केल्यावर केवळ दोन हजार असल्याचे दिसून आले. कागल तालुक्यातील व्हन्नुर गावाच्या सागर संकपाळ या शेतकऱ्यास महावितरणकडून १ लाख ९ हजार ७५० रुपयांचे बिल देण्यात आले होते. एवढ्या मोठ्या रकमेचे बिल आल्याचे पाहून सदर शेतकऱ्यास घाम फुटला. हे बिल अवाजवी असून ते दुरुस्त करून द्यावे म्हणून त्यांनी मागणी केली पण महावितरणने आपल्या नेहमीच्या रुबाबात 'आधी बिल भरा मग पाहू' असेच सुनावले आणि मग अशक्य असल्याने हे बिल भरले गेले नाही. शिबिरे घेऊन कृषी पंपाची बिले दुरुस्त करून देण्याचा निर्णय घेवून प्रत्यक्ष ही मोहीम सरू झाली तेंव्हा सागर संकपाळ यांनी आपलेही बिल या शिबिरात नेले. त्यांचे १ लाख ९ हजार ७५० रुपयांचे बिल या मोहिमेत दुरुस्त करण्यात आले आणि लाखांऐवजी केवळ २ हजार बिल असल्याचे महावितरणने दुरुस्ती करून दिले. संकपाळ यांनी मोठ्या आनंदाने हे २ हजाराचे बिल भरले आणि महावितरणला नव्हे तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मनापासून धन्यवाद दिले. या शेतकऱ्याने आधी तळमळून आणि वारंवार विनंती करूनही महावितरणने त्यांचे ऐकून देखील घेतले नव्हते. ज्या शेतकऱ्याचे वीज बिल २ हजार आहे त्यांना जर १ लाखाहून अधिक रकमेचे बिल दिले असेल तर थकबाकीचा आकडा दिसायलाच मोठा असणार आहे. या मोहिमेत अनेक शेतकऱ्यांची बिले दुरुस्त होत आहेत आणि दुरुस्त झालेली बिले शेतकरी मोठ्या आनंदाने भरीत आहेत. शेतकरी वीज बिल भरीत नाहीत असा आकांडतांडव करणे व्यर्थ असल्याचेच या मोहिमेत दिसत असून अनेक शतकाऱ्याना अशाच प्रकारची चुकीची बिले आलेली असल्याचे दुरुस्ती मोहिमेत समोर येत आहे. महावितरणने स्वत: चूक करायची आणि त्याची शिक्षा कृषी पंपाच्या ग्राहकांच्या माथी मारायची असाच प्रकार केला असल्याचे या बिल दुरुस्ती शिबिरातून समोर येताना दिसत आहे. मोठ्या रकमेची बिले दुरुस्तीनंतर एकदम कमी होवून मिळू लागल्याचे लोक स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राजू शेट्टी यांना धन्यवाद देताना दिसत आहेत.
0 Comments