Breaking News

७५ वर्षांच्या वृध्देवर लैंगिक अत्याचार करून खून!

 ७५ वर्षांच्या वृध्देवर लैंगिक अत्याचार करून खून!

अक्कलकोट: अक्कलकोट तालुक्यात एका ७५ वर्षांच्या वृध्देवर  लैंगिक अत्याचार करून नंतर तिचा खून केल्याबद्दल ४८ वर्षांच्या नराधमाला सोलापूरच्या सत्र न्यायालयाने दोषी धरले आहे. त्यामुळे आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली आहे. मंगळवारी आरोपीला शिक्षा सुनावली जाणार आहे.


मृत वृध्द महिला आपल्या पतीसोबत १९ जानेवारी २०१९ रोजी जिल्हा सहकारी बँकेच्या शाखेत पैसे काढण्यासाठी गेली होती. नंतर ती अचानक गायब झाली. त्यामुळे मुलाने वृध्द आईचा शोध सुरू केला असता अक्कलकोट स्टेशन ते तोळणूर रस्त्यावर कडबगाव शिवारात वृध्द महिला मृतावस्थेत आढळून आली. अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात याबाबत अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करून तपास सुरू झाला.


मिळालेल्या माहितीनुसार ,शवविच्छेदन अहवालात मृत वृध्द महिलेवर लैंगिक अत्याचार होऊन नंतर तिचा खून झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरूध्द गुन्हा दाखल केला होता.


तपासात मृत वृध्द महिलेसोबत एका व्यक्तीला पाहणारे मल्लिनाथ करपे यांनी पोलिसांसमोर जबाब दिला असता या व्यक्तीने सांगितलेल्या वर्णनानुसार, पोलिसांनी संशयित म्हणून आरोपी मल्लप्पा बनसोडे यास मैंदर्गी येथे ताब्यात घेतले. त्याने दिलेल्या माहितीनुसार, त्याने मृत वृध्द महिलेवर लैंगिक अत्याचार केले आणि नंतर गुप्तांगात ज्वारीचे कांडके घालून अमानुष कृत्य केले. यात प्रचंड रक्तस्त्राव झाल्यामुळे वृध्देचा मृत्यू झाल्याचे आढळून आले होते.


या खटल्यात जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत यांनी १५ साक्षीदार तपासले. यात न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा आणि शवविच्छेदनाचा अहवाल महत्त्वाचा ठरला आहे. आरोपीने केलेले कृत्य अतिशय क्रूर आणि अमानुष असून त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी.

Post a Comment

0 Comments