सोलापूर : सांगोला तालुक्यात 4 हजार घरकुले पूर्ण
सांगोला : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत एकूण 6 हजार 495 पैकी 4 हजार 364 घरकुले पूर्ण झाली आहेत, तर 2 हजार 087 घरकुले बांधकाम अपूर्ण असल्याची माहिती सहायक गटविकास अधिकारी विकास काळुखे यांनी दिली आहेरमाई आवास योजनेंतर्गत 1 हजार 189 घरकुलांपैकी 950 घरकुले पूर्ण तर 237 घरकुले अपूर्ण आहेत. यामध्ये सांगोला तालुक्यातील 1 हजार 300 लाभार्थ्यांची मंजूर घरकुले जागेअभावी प्रलंबित आहेत.
ही घरकुले त्या-त्या लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरून जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासह लाभार्थ्यांनी जागा खरेदी केल्यास लाभार्थ्यांना 50 हजार रुपये देण्याची शासनाची योजना आहे. यासाठी पंचायत समिती प्रशासनाने लाभार्थ्यांना आवाहन केले आहे. सन 2016 ते 2021 या पाच वर्षात केंद्रपुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत तालुक्यात एकूण 6 हजार 495 घरकुल लाभार्थ्यांना घरकुल देण्यासंदर्भात मंजुरी मिळाली होती. त्यापैकी आजअखेर 4 हजार 364 घरकुल पूर्ण झाले आहेत. 2 हजार 087 घरकुल बांधकाम अपूर्ण आहेत.
तसेच राज्यपुरस्कृत रमाई आवास योजना अंतर्गत सन 2016-17 ते सन 2019- 20 या 4 वर्षांत 1 हजार 189 घरकुलांना मंजुरी मिळाली होती.पैकी 950 घरकुले पूर्ण झाली आहेत, तर 237 घरकुले अपूर्ण आहेत. यासह प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 1 हजार 300 घरकुलांना मंजुरी देणे बाकी आहे. सांगोला तालुक्यात सर्वाधिक घरकुल बांधकामांना मंजुरी मिळाली आहे.
सन 2016 मध्ये केंद्र शासनाच्या आदेशानुसार प्रसिद्ध झालेल्या घरकुल यादीमध्ये काही गरजू लाभार्थी वंचित राहिले होते. या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी शासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आला. त्यानुसार घरकुलांकरिता अर्ज मागवण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार तालुक्यातील 76 ग्रामपंचायतींकडून सुमारे 16 हजार 261 अर्ज प्राप्त झाले होते. हे अर्ज नंतर ग्रामपंचायत व पंचायत समितीच्या माध्यमातून या लाभार्थ्यांची योग्य ती प्रत्यक्ष सर्वेक्षण केले. ही माहिती अॅपवर देण्यात आली. त्या माहितीनुसार केंद्र शासनाकडून 13 हजार 302 लाभार्थी घरकुल योजनेसाठी पात्र असल्याचे पंचायत समिती कार्यालयाला कळविण्यात आले.
त्यानंतर पंचायत समिती कार्यालयाकडून प्रत्यक्ष स्थळ पाहणी करण्याची प्रक्रिया सुरू केली व आज ती पूर्ण झाली आहे. यामध्ये 13 नमुने अर्थात निकषाद्वारे तपासणी केली आहे. या प्रत्यक्ष स्थळ पाहणीनंतर ग्रामपंचायतीकडून पात्र व अपात्र अशा 2 याद्या मागवण्यात आल्या आहेत. दरम्यान, ग्रामपंचायतीने दिलेल्या पात्र याद्या या ग्रामसभेसमोर वाचन करण्यात येणार आहेत. ग्रामसभेच्या वाचनानंतर प्राधान्यक्रम ठरवून जिल्हास्तरावर अंतिम मंजुरीकरिता जिल्हा ग्रामीण यंत्रणेकडे पाठवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
लाभार्थ्यांनी वेळेत बांधकाम पूर्ण करा…
येत्या काळात प्रधानमंत्री घरकूल योजना प्रभावीपणे राबवणे व दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पंचायत समिती प्रशासनाला लाभार्थ्यांनी वेळेत घरकुलांची बांधकामे पूर्ण करून सहकार्य करावे, असेही आवाहन पंचायत समितीचे सहायक गटविकास अधिकारी विकास काळुखे यांनी केले आहे.

0 Comments