google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 नवजात अर्भक रस्त्यावर फेकले पण देव तारी त्याला ---!

Breaking News

नवजात अर्भक रस्त्यावर फेकले पण देव तारी त्याला ---!

 नवजात अर्भक रस्त्यावर फेकले पण देव तारी त्याला ---!



पंढरपूर : नुकतेच जन्मलेले बाळ मरण्यासाठी रस्त्यावर फेकून निर्दयी माता निघून गेली पण 'देव तरी त्याला कोण मारी' चा प्रत्यय आला आणि हे बाळ रुग्णालयात पोहोचले !

नवजात बालकाला कुठेतरी निर्जन रस्त्यावर फेकून देण्याच्या अनेक घटना घडत असतात. अनैतिक संबंधातून जन्मलेल्या निष्पाप बाळावर हमखास अशी दुर्दैवी वेळ येत असते. अशीच एक घटना पंढरपूर तालुक्यात नारायण चिंचोली येथे घडली पण या नवजात बाळाच्या मदतीला देव धावून आल्याप्रमाणे घटना घडली. पंढरपूर - मोहोळ रस्त्यावर असलेल्या नारायण चिंचोली या गावाजवळ साईराज ढाब्याच्या समोरच्या बाजूला अंधाराचा फायदा घेऊन एक मातेने हे पाप केले होते. नुकत्याच जन्मलेल्या बाळाला रस्त्याच्या मध्यभागी ठेवून मातृत्वाला कलंक असलेली कुणी माता निघून गेली होती. 


अंधाराचा रस्ता आणि रस्त्याच्या मध्यभागी ठेवलेल्या या बाळाला एखादे वाहन सहज चिरडून गेले असते पण ज्याला देव तारतो त्याला मारणार तरी कोण ? फुलचिंचोली येथील अविनाश नागनाथ वसेकर हे रात्री साडे दहा वाजण्याच्या दरम्यान चार चाकी गाडीने मायाक्का चिंचणी येथे दर्शनासाठी निघाले होते. अचानक त्यांना रस्त्यावर काही दिसले. 


वसेकर यांनी लगेच गाडी बाजूला घेऊन थांबवली आणि मोबाईलच्या बॅटरीच्या प्रकाशझोतात त्यांनी जवळ जाऊन पहिले असता नुकतेच जन्मलेले एक पुरुष जातीचे बालक त्यांना दिसले. साधारण एक ते दोन तासापूर्वीच या बालकाचा जन्म झाला असावा. वसेकर यांनी आजूबाजूला कानोसा घेतला पण त्यांना कुणीच दिसले नाही. एकूण परिस्थिती पाहून वसेकर याना घडलेल्या प्रकाराचा अंदाज आला. त्यांनी बालकाला कपड्यात गुंडाळून अलगद बाजूला घेतले.   


वसेकर यांनी नारायण चिंचोली येथील त्यांच्या परिचयाचे असलेले महेश गुंड याना याबाबत माहिती दिली आणि त्या ठिकाणी बोलावून घेतले. महेश गुंड आणि चार पाच गावकरी लगेच त्या ठिकाणी आले. त्यांनी मिळून या बालकाला उपचारासाठी पंढरपूर येथील एक रुग्णालयात दाखल केले आणि पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस आता 'त्या' निर्दयी मातेचा शोध घेत असून परिसरात या घटनेची चर्चा सुरु झाली आहे. अंधारात रस्त्यावर फेकेलेल्या बाळाला मात्र वसेकर यांच्यामुळे एक दोन तासात दुसरा जन्म मिळाला आहे. अविनाश वसेकर याना धन्यवाद दिले जात आहेत.

Post a Comment

0 Comments