लग्नासाठी तरुणाने रचली चिता आणि घेतले पेटऊन !
बुलढाणा : लग्न जमत नसल्याने आलेल्या नैराश्यातून एका तरुणाने आपल्या हाताने चिता रचली आणि त्याच चितेवर आत्महत्या केल्याची हृदयद्रावक आणि तितकीच धक्कादायक घटना घडली आहे.
मुलींची संख्या अपुरी असल्यामुळे लग्न जमवताना अलीकडे तरुणांना बराच प्रयत्न करावा लागू लागला आहे. त्यात मुलींच्या वाढलेल्या अपेक्षा तरुण पूर्ण करू शकत नाहीत त्यामुळे देखील वय वाढलं तरी विवाह जुळत नसल्याचे अनेकदा दिसून येते. आर्थिक परिस्थिती बेताची असली तर मुली देण्यास नकार दिला जातो, त्यात सामान्य शेतकरी कुटुंब म्हटलं की या कुटुंबातील मुलांची लग्न जमवणं हे भलतेच कठीण होऊन बसू लागले आहे. एकीकडे वय वाढत जातं आणि दुसरीकडे लग्न जमत नाही म्हटलं की नैराश्य येते आणि याच नैराश्यातून खामगाव पळशी खुर्द येथील ही घटना समोर आली आहे.
महेंद्र नामदेव बेलसरे या तरुण शेतकऱ्याने लग्न जमत नसल्याच्या नैराश्यातून आपल्या हाताने आपली चिता रचली आणि हीच चिता पेटवून आपल्या आयुष्याचा शेवट देखील केला. ही घटना जेंव्हा प्रकाशात आली तेंव्हा प्रत्येकाला धक्का बसला आहे. शेतकरी आधीच आर्थिक संकटात असतो आणि शेतकरी तरुणाला मुली देताना हजार वेळा विचार केला जातो. असाच प्रकार महेंद्र बेलसरे याच्याबाबत घडला आहे. वय वाढत चाललेले असताना त्याला मुलगी देण्यास मात्र नकार मिळत होता. 'मला कुणी मुलगी देत नाही, माझं लग्न करू द्या' अशी विनंती त्याने आपल्या भाउजीना केली. त्यांनीही आपण प्रयत्न करू असे सांगितले. त्यांच्यापासून महेंद्र निघून गेला आणि त्याच दिवशी ही घटना घडली.
विवाह जुळत नाही, लग्नासाठी मुलगी देण्यास कुणी तयार होत नाही या नैराश्यातून ग्रासलेल्या महेंद्र बेलसरे या तरुण शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलले आणि आपल्या हाताने आपली चिता रचून त्याने ती पेटवून, स्वतःला जिवंत जाळून आत्महत्या केली. लग्न जमत नसल्याच्या नैराश्यातून त्याने आत्महत्या केली असून दुसरे कोणतेही कारण नसल्याचे महेंद्रच्या नातेवाईकानी पोलिसांना सांगितले आहे. या घटनेने मात्र अनेकांना धक्का बसला असून प्रचंड हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
बदलत्या काळानुसार लग्नाच्या संकल्पनाही बदलत गेल्या आहेत. पूर्वी मुलगा आणि त्याचे कुटुंब यांच्या अटींना महत्व देवून विवाह जमत होते. वडील ठरवतील त्या मुलाशी लग्न करण्यास मुली तयार होत होत्या. आता परिस्थिती पूर्ण बदलली असून मुलीच्या अटींना महत्व आले आहे. शिवाय मुलींचा जन्मदर ढासळत असल्यामुळे देखील परिस्थिती बरीच बदलून जाताना दिसत आहे. कालानुरूप बदल झालेले असून अनेक तरुण विवाहाविनाच राहिलेले असल्याचेही समाजात दिसून येत आहे.
तरुण शेतकरी महेंद्र याने लग्नासाठी केलेली आत्महत्या ही काही पहिली घटना नाही. या आधी देखील येवला येथे अशीच एक घटना घडली होती. येवला तालुक्यातील अंदरसूल नावाच्या गावात अमोल गणपत जाधव या २१ वर्षीय तरुणाने याच कारणाने आत्महत्या केली होती. शहरात मोबाईल शॉपी चालविणारा तरुण अमोल जाधव हा आपल्या पायावर उभा राहिला होता. त्यानंतर त्याने नव्या जीवनाची सुरुवात करण्याची स्वप्ने पहिली आणि लग्नासाठी मुली शोधण्याचा कार्यक्रम हाती घेतला. मुलींकडून मात्र सतत नकार येत राहिला आणि यातून त्याला प्रचंड नैराश्य आले. या नैराश्यातून त्याने गळफास घेऊन आपले आयुष्य संपविले होते.

0 Comments