सोलापूर : निवडणुकीच्या तोंडावर भांडवली कामांचा वाढला जोर
सोलापूर : गेल्या दोन महिन्यांपासून विद्यमान नगरसेवकांनी भांडवली निधीतून प्रभागात विकासकामांचा जोर वाढविला आहे. प्रभागरचनेनंतर सोयीचा प्रभाग बघत विकासकामांच्या उद्घाटनासाठी जणू स्पर्धाच लागली आहे.
निवडणुकीच्या तोंडावर शहरात ९८ कोटींची भांडवली कामे सुरू असल्याने महापालिकेत शुकशुकाट तर प्रभागात विद्यमान नगरसेवक, लोकप्रतिनिधी, पक्षीय पदाधिकाऱ्यांचे उद्घाटन सोहळे रंगू लागले आहेत.
महापालिका निवडणुकीचे घोडामैदान जवळ आल्याने महापालिकेच्या भांडवली निधीसह इतर शासकीय निधीतून विकासकामांचा बार उडत आहे. मागील पाच वर्षातील विकासकामे अवघ्या दोन महिन्यांत उरकून प्रभागातील जनतेला खूश करण्यासाठी सर्वच पक्ष सरसावले आहेत. शहरात ठिकठिकाणी कोट्यवधींच्या विकासकामांचे फलकझळकू लागले आहेत. प्रभागातील जनता हेच माझे दैवत म्हणत नगरसेवक नेत्यांच्या नव्हे तर नागरिकांच्या हस्ते कामांचे उद्घाटन करीत जनतेमध्ये आपलेपणाची भावना निर्माण करण्यासाठीही विविध फंडे वापरत आहेत.
सन २०१७ निवडणुकीपूर्वी भांडवली कामापोटीची १८० कोटी रुपयांची मक्तेदारांची देणी महापालिकेवर होती. तत्कालिन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी मक्तेदारांची मागील देणी दिल्याशिवाय नवीन कामे हाती घ्यायचे नाही.
कोरोना, सत्ताबदलाचे कारण
निवडणुकीच्या तोंडावर प्रभागातील नागरिकही विकासकामांबाबत जागरूक झाले आहेत. विकासकामांना ब्रेक लागल्यानंतर लोकभावना लक्षात घेऊन सर्वपक्षीय नगरसेवक सोयीचे कारण सांगण्यात पटाईत झाले आहेत. कोणी कोविडमुळे काम करता आले नसल्याचा दाखला देतो, तर कोणी राज्यात सत्ता बदलल्यामुळे विकासकामे रखडल्याचा पुरावा देत आहे. स्वत:चे अपयश लपवून पुन्हा मताची झोळी भरून घेण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत.
वर्षनिहाय मंजूर भांडवली निधी
सन २०१७-१८
हद्दवाढ ३० लाख
शहर २० लाख
एकूण २६ कोटी ४० लाख
सन २०१८-१९
भांडवली निधी वाटपच नाही
सन २०१९-२०
हद्दवाढ ३० लाख
शहर २० लाख
एकूण २६ कोटी ४० लाख
सन २०२०-२१
हद्दवाढ ३५ लाख
शहर २५ लाख
एकूण ३१ कोटी ५० लाख
सन २०२१-२२
हद्दवाढ ३५ लाख
शहर ३५ लाख
एकूण ३९ कोटी ९० लाख

0 Comments