google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 प्राणघातक अपघातापासून उपकरण वाचविणार प्राण !

Breaking News

प्राणघातक अपघातापासून उपकरण वाचविणार प्राण !

 प्राणघातक अपघातापासून उपकरण वाचविणार प्राण !



पुणे : चालकाच्या झोपेमुळे होणाऱ्या अपघातांची संख्या मोठी असून आता चालकाला जागे करणारे आणि झोप यायला लागली असल्याची सूचना देणारे एक उपकरण अपघात टाळणार आहे.  


गेल्या काही वर्षांपासून अपघाताचे प्रमाण प्रचंड वाढले आहे आणि अपघातात होणाऱ्या मृत्यूंची संख्याही रोज वाढतच आहे. त्यात रस्ते चकाचक झाल्याने वेगावर तर काही मर्यादाच राहिली नाही आणि माणसांच्या जीवांची पर्वाही उरलेली नाही. त्यात रात्री आणि विशेषत: पहाटे होणारे अपघात अधिक असतात. 


हे अपघात झोपेवर नियंत्रण न राहिल्यामुळे होत असतात. डोळ्यावर केंव्हा झापड येते आणि डुलकी लागते हे कळायच्या आत तर सगळे काही घडून गेले असते.  एक डुलकी अनेकांच्या जीवावर उठत असते आणि झोपेवर नियंत्रण ठेवणे ठरवूनही शक्य होत नसते. यावर उपाय म्हणून एक उपकरण तयार करण्यात आले असून हे उपकरण चालकाला झोप यायला लागली असल्याची सूचना देत आहे. 


नागपूर येथील गौरव सावलाखे यांनी हे उपकरण तयार केले असून झोपेच्या समस्येवर ते अत्यंत उपयोगी असल्याचे सांगण्यात आले आहे.  चालकाला झोप लागताच हे उपकरण सावध करीत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. महागड्या कारमध्ये सुरक्षेची विविध उपकरणे लावण्यात आलेली असतात पण सामान्य कारमध्ये झोपेच्या 


वेळी वाहनाचा समतोल राखील किंवा अपघात होत असताना वेग कमी करील अशी कसलीच उपकरणे नसतात. गौरव सावलाखे यांनी तयार केलेले हे उपकरण मात्र सामान्य कार आणि प्रवाशी यांना अपघातापासून वाचवू शकते.गौरव यांच्या गाडीला एकदा झोपेमुळे अपघात झाला होता आणि या अपघातात ते जखमी झाले होते. या अपघातामुळे त्यांना अशी कल्पना सुचली आणि त्यांनी हे उपकरण बनवले आहे. 


उपकरण बनविणाऱ्या गौरव यांनी दिलेल्या माहितीनुसार वाहन चालवताना हे उपकरण कानाच्या मागच्या बाजूस ठेवले जाते. ३.६ व्होल्टच्या बॅटरीसह असलेल्या या उपकरणास सेन्सर जोडण्यात आलेले आहे. गाडी चालवताना चालकाचे डोके स्टिअरिंगच्या दिशेने ३० अंश झुकले की या उपकरणात कंपन सुरु होते आणि चालकाला ते सतर्क करते. झोपेच्या वेळेस डोके ३० अंश कोनात झुकते आणि याचवेळी हे उपकरण सक्रिय होते अशी माहिती गौरव यांनी दिली आहे. अपघातापासून वाचण्यासाठी हे खूप मोठे वरदान ठरणार आहे. 


काही दिवसांपूर्वीच अशाच प्रकारे झोपेची सूचना देणारा एक चष्मा तयार करण्यात आला आहे.बारावीत शिकणाऱ्या नवाब सुफियान शेख या विद्यार्थ्याने असा एक चष्मा तयार केलाय की त्यामुळे अपघात आणि प्राण देखील वाचू शकणार आहेत. नवाबच्या जवळच्या काही लोकांचा अपघातात मृत्यू झाला आणि तो अस्वस्थ झाला. 


अपघातावर काहीतरी उपाय शोधला पाहिजे असं त्याला वाटलं आणि लोकांचे अपघातात होणारे मृत्यू टाळण्यासाठी तो कामाला लागला. प्रयत्न केल्यावर काहीही अशक्य नसतं असं म्हणतात ते काही खोटं नाही. हजार रुपयापेक्षा कमी खर्चात त्याने असा एक चष्मा बनवलाय की तोच आता अपघात होण्यापासून वाचवतोय !


नवाबने चष्म्यात असे एक सेन्सर बसवले आहे की ते सतत तुमच्या डोळ्यावर लक्ष ठेवत असते. तुमच्या डोळ्यावर झोप यायला लागली की हे सेन्सर वाजायला लागते. त्याचा आवाज एकट्यापुरताच नव्हे तर आजूबाजूला बसलेल्या अन्य लोकांनाही ऐकायला जातो आणि मग सगळेच सावध होतात. चालकाला झोपलागायला लागली हे सगळ्यांनाच कळतं आणि मग संभाव्य अपघातही टळतो 


आणि अपघातात होणारे मृत्यूही टळतात. या चष्म्याला त्याने एक बॅटरी बसवली आहे, ही बॅटरी सेन्सरसाठी आवश्यक आहे. आता प्रत्यक्षात अशा चष्म्याचा वापर सर्रास करता येईल काय ? हे मात्र पाहावे लागणार आहे. त्यानंतर आता नागपूरच्या गौरव सावलाखे यांनी उपकरण तयार  केले आहे.

Post a Comment

0 Comments