बापरे ! पोटातून काढला चक्क काचेचा ग्लास !
पाटणा : पंचावन्न वर्षे वयाच्या एका व्यक्तीच्या पोटातून चक्क काचेचा ग्लास बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश मिळाले आहे पण काचेचा ग्लास पोटात गेलाच कसा ? या प्रश्नांचे उत्तर मात्र डॉक्टरना देखील मिळाले नाही.
अनेकांच्या पोटातून कात्री अथवा शस्त्रक्रियेसाठी वापरले जाणारे साहित्य नंतर कधीतरी बाहेर काढले जाते. शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांकडून चुकून पोटात कात्री राहिल्याचे काही किस्से समोर आलेले आहेत. कात्रीशिवाय अन्य काही साहित्य देखील पोटात राहिल्याने रुग्णाला त्रास झाला आणि नंतर तपासणी केल्यानंतर या वस्तू पोटात आढळल्या. अशा घटना तर समोर आलेल्याच आहेत पण केस खाण्याची सवय असलेल्या काही महिलांच्या पोटातून केसांची भले मोठे गोळे देखील काढण्यात आले आहेत. पोटातून काचेचा ग्लास निघण्याची मात्र ही बहुधा पहिलीच वेळ असून डॉक्टर देखील चक्रावून गेले आहेत.
एका रुग्णाच्या पोटात सतत दुखत होते. पोटदुखीची तक्रार घेऊन सदर व्यक्ती मुझफ्फरपूर मादिपूर भागात असलेल्या एका खाजगी रुग्णालयात गेला होता. वैशाली जिल्ह्यातील महुआ येथील रहिवाशी असलेल्या या रुग्णाच्या पोटात दुखण्याचे निदान करण्यासाठी अल्ट्रासाऊंड आणि एक्स रे तपासणी करण्यात आली. या अहवालात डॉक्टरांना त्यांच्या आतड्यात काही गडबड असल्याने दिसून आले. त्यानंतर अधिक तपासणी केली असता रुग्णाच्या पोटात चक्क काचेचा ग्लास असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले आणि डॉक्टर देखील चक्रावून गेले.
सुरुवातीला इंडोस्कोपीक प्रक्रिया करून हा ग्लास बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला पण तो काही यशस्वी झाला नाही. अखेर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रिया करून रुग्णाच्या पोटातून एक काचेचा ग्लास बाहेर काढण्यात आला. या यशस्वी शस्त्रक्रियेबाबत डॉक्टरना समाधान असले तरी काचेचा ग्लास रुग्णाच्या पोटात कसा जाऊ शकतो हे कोडे मात्र डॉक्टरांना सुटलेले नाही. रुग्ण चहा पिताना ग्लास गिळला असेल असे म्हटले तरी त्यावर विश्वास ठेवता येणार नाही असे डॉक्टरांना वाटत आहे. मानवी अन्ननलिका अरुंद असतात आणि त्यातून अशा वस्तू पोटात जाणे शक्य नाही असे देखील डॉक्टरांना वाटत आहे.
शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून ग्लास काढण्यात यश आले पण ग्लास आत गेला कसा याचे गूढ काही केल्या उलघडताना दिसत नाही. शस्त्रक्रियेचे व्हिडीओ फुटेज या डॉक्टरनी शेअर केले आहे. ते पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसत आहे पण प्रश्नाचे उत्तर काही मिळत नाही. पोटातून काचेचा ग्लास काढल्यानंतर रुग्णाची प्रकृती ठीक असून त्यांना पूर्ण बरे होण्यासाठी बराच वेळ लागेल. त्याच्यानंतर आतड्याचे काम पाहिल्यासारखे सामान्यपणे काम करील असे डॉक्टर सांगत आहेत.

0 Comments