सांगोला नगरपरिषद इमारतीवर "सौरऊर्जा प्रकल्प" कार्यान्वित
वीजबिलात होतीय लक्षणीय बचत !
सांगोला/प्रतिनिधी - पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या पृथ्वी, जल, आकाश,वायू,अग्नी या पंचतत्वावर आधारित माझी वसुंधरा अभियान 2.0 मध्ये सांगोले नगरपरिषदेमार्फत पर्यावरण संरक्षण व संवर्धन करणेसाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. या अभियानात "अग्नी(Energy)" या घटकांतर्गत नगरपरिषद कार्यालय इमारतीवर सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पाची स्थापना केल्याची माहिती मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली.
दिवसेंदिवस जगाची तसेच देशाची लोकसंख्या वाढत असून या वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात अन्न, वस्त्र, निवारा याबरोबर मानवाला आजच्या काळात अत्यंत आवश्यक असलेल्या विजेची मागणी हीदेखील वाढत आहे. ही वीज प्रामुख्याने दगडी कोळसा, पेट्रोल, डिझेल यासारख्या पारंपारीक स्रोताद्वारे तयार केली जाते.
मोठ्या प्रमाणातील विजेच्या मागणीमुळे व वापरामुळे या स्रोतांचे साठे संपुष्टात येणाच्या मार्गावर आहेत. त्यामुळे भविष्यात या स्रोतांना पर्यायी स्रोत्यांचा शोध घेणे व त्यापासून वीजनिर्मिती करणे काळाची गरज बनली आहे. पाण्याच्या लाटा, वाहती हवा, सूर्यापासून येणारी ऊर्जा हे कधीही न संपणारे ऊर्जेचे स्रोत असल्याने पुढील काळ हा यावर आधारित वीजनिर्मिती चा काळ असणार आहे.
काळाची ही गरज ओळखून सांगोला नगरपरिषदेमार्फत कार्यालयाच्या इमारतीवर 7 किलो वॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाची स्थापना केली आहे. यामध्ये 28 सौरऊर्जा पॅनल बसविण्यात आले असून प्रत्येक पॅनल ची वीजनिर्मिती क्षमता ही 250 वॅट इतकी आहे. यामधून तयार होणार वीज ही बॅटरींमध्ये साठवून ठेवली जात असून याद्वारे कार्यालयातील संगणक,पंखे,फॅन चालवले जात आहेत. सदर सौरऊर्जा प्रकल्प सुरू केल्यानंतर कार्यालयाच्या विजबिलात दरमहा 7 ते 8 हजारांपर्यंत घट झाली असून हा प्रकल्प फायद्याचा ठरत असल्याची माहिती मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली.
मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प यशस्वीपणे सुरू करण्यात विद्युत अभियंता राजकुमार सपाटे, लाईटमन किसन मोरे, आबा लवटे व विद्युत विभागातील इतर कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.
चौकट - सौरऊर्जा वापर,त्यातून होणारे फायदे याबाबत जनमानसात जनजागृती व्हावी व यातून प्रोत्साहित होऊन नागरिकांनी,व्यापाऱ्यांनी घरांच्या,व्यावसायिक कार्यालयाच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्प सुरू करावेत या उद्देशाने "माझी वसुंधरा" अभियानांतर्गत हा सौरऊर्जा प्रकल्प नगरपरिषद इमारतीवर कार्यान्वित करण्यात आला आहे.
कैलास केंद्रे
मुख्याधिकारी,सांगोला नगरपरिषद

0 Comments