सोलापूर : सोशल मीडियावर निवडणुकीची रणधुमाळी
सोलापूर: महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभागरचनेचा प्रारुप आराखडा तयार झाल्यापासून सोशल मीडियावर निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. यात नगरसेवक बनण्यास इच्छुकांमध्ये तर चांगलीच ओढ लागली आहे.सोशल मीडियावर त्यांच्या हालचालींना वेग आला आहे. बहुतेक इच्छुकांनी आपापल्या प्रभागांचा नकाशा सोशल मीडियावर प्रसिद्ध करून प्रचार सुरू केला आहे.
निवडणुकीच्या मैदानात दंड थोपाटण्यासाठी इच्छुक असलेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. प्रभागातील मतदारांना आपल्याकडे कसे आकर्षित करता येईल, तसेच तिकिटांसाठी दावेदारी कशाप्रकारे मजबूत करता येईल असाच सर्वांचा प्रयत्न सध्या सुरू आहे. यात सद्यस्थितीत प्रत्येक प्रभागातील विकास कसा आणखी उत्तम प्रकारे करता येईल? याबाबत इच्छुक मंडळी आपले मत व्यक्त करताना दिसून येत आहेत.
प्रभागातील मुख्य समस्या सर्वांपुढे आणून त्या कशा प्रकारे सोडविता येतील, याचा पाढाच वाचून दाखविला जात आहे. महापालिकेतील सत्तापक्ष असलेल्या भाजपकडे सर्वाधिक नगरसेवक आहेत. त्याचप्रमाणे काँग्रेस व शिवसेना याकडेही उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या कमी नाही. महिलाही यात आघाडीवर आहेत. कारण त्यांच्यासाठी जागा आरक्षित आहे.
राष्ट्रवादी, काँग्रेस, बसपा, एमआयएम, मनसे, वंचित बहुजन आघाडी इच्छुक उमेदवारांच्या शोधात आहे. प्रत्येक पक्षाला त्यांचे सामर्थ्य वाढवायचे आहे. प्रत्येकच पक्ष महिला असो अथवा पुरुष उत्तम उमेदवाराच्या शोधात आहेत. सध्या यावर राजकीय पक्षांमध्ये खल सुरू आहे. महापालिकेच्या प्रभागाची अंतिम रचना ही मार्च महिन्यात प्रसिद्ध होईल. त्यानंतर लगेच आरक्षण प्रक्रियेची घोषणा होईल.
ते बघता बहुतांश उमेदवार दुहेरी कार्य करीत आहेत. प्रभागात तयारी करीत आहेत. प्रभागात महिला आरक्षण जाहीर झाल्यास पत्नीला संधी दिली जाईल आणि पुरुष आरक्षण झाल्यास स्वतः उभे राहण्याचा निर्णय घेतला जाईल. त्यामुळेच सर्व बाजूंनी तयारी सध्या सुरू झाली असून, त्याला आणखी काही दिवसात वेग येणार आहे.
युवकांची वाढणार संख्या
अद्याप कोणत्याही राजकीय पक्षाने उमेदवारांची निश्चिती केलेली नाही. त्यामुळे अमुक पक्षाकडून लढण्यास इच्छुकांनी आपली क्षमता दाखविण्याचा प्रयत्न चालविला आहे. केवळ समाज माध्यमावरच नव्हे तर आपापल्या प्रभागातील फलकांवर फोटो झळकतील यासाठी प्रयत्न करीत आहेत. बरं, हे बहुतांश नवे चेहरे आहेत. ते बघता महापालिका निवडणुकीत यंदा युवकांची संख्या वाढणार आहे, हे स्पष्ट दिसून येत आहे.
आरक्षणाच्या घोषणेची प्रतीक्षा
आरक्षण घोषित झाल्यानंतर आणखी नव्या चेहऱ्यांची भर पडू शकते. सध्या सर्वचजण आरक्षणाची केव्हा एकदा घोषणा होते याची वाट पाहत आहेत. यात पुरुष व महिला उमेदवारांचा समावेश आहे. इच्छुक मंडळी फेसबुक, व्हॉटस् ॲप स्टेटससह व इतर सोशल मीडियावर झळकत आहे. अगदी लहानसहान कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी दिली जात असून, त्यांचे आयोजन हे आठवणीत राहील अशा प्रकारे करण्यात येत आहे.

0 Comments