कोरोनाचा नवा गडी आलाय! 'आता परत बंद म्हणजे लय अवघड हाय
सांगोला (सोलापूर) : 'आत्ता कुठं सुरळीत झालं असं वाटतंय, तेवढ्याच कोरोनाचा नवा गडी आलाच. आता परत बंद पडलं तर आमचं लय अवघड होईल', सांगोला आठवडा बाजारात रस्त्यावर किरकोळ कपडे विकून जीवन जगणारा व्यापारी आपली अगतिकता बोलून दाखवत होता. देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून पूर्वीप्रमाणे जीवनमान सुरळीत होऊ लागले आहे. दुकाने, आठवडे बाजार, शाळा, कॉलेज संपूर्णपणे सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. याच पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रिकेत 'ओमीक्रोन' हा कोरोनाचा नवा विषाणू आढळल्याने संपूर्ण जगात कोरोनाच्या या नव्या विषाणूची चर्चा सुरू आहे.
कर्नाटकमध्ये दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या दोघांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे उघड झाल्याने राज्य शासनाने याबाबत गांभीर्याने घेतले आहे. त्यामुळे याबाबत सोशल मीडियावर सगळीकडे पुन्हा मेसेज फिरू लागले आहेत. राज्य शासन पुन्हा नव्याने काही निर्बंध घालेल का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडियावरील या चर्चेमुळे किरकोळ व्यापारी मात्र या त्रस्त झाले आहेत. नव्याने पुन्हा निर्बंध काही घातले तर आमचे जीवनच बिघडून जाईल, असे ते आवर्जून सांगतात.
निर्बंधाबाबत भीती, मात्र नियमांची पायमल्ली
राज्य व केंद्र शासनाने कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागल्याने हळूहळू सर्वच निर्बंध शिथिल केले आहेत. मात्र शासनाने प्रत्येक नागरिकाने नियमांचे पालन करावे, असे सांगितले आहे. मात्र शहर व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी कोरोनाच्या नियमांचे पालन केले जात नाही. दुकानदार, व्यापाऱ्यांना निर्बंधाबाबत भीती वाटते तेच व्यापारी कोरोना नियमांचे पालन करत नसल्याचे दिसून येतात. आठवडे बाजारात आलेल्या अनेक नागरिकांच्या तोंडाला साधा मास्कही दिसत नाही.
नियम पाळा, लॉकडाउन टाळा
यापुढे कोरोनाचे नव-नवीन विषाणू येणारच आहेत. परंतु, नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळले तर कोणत्याच विषाणूचा प्रसार होणार नाही. प्रत्येक नागरिकाने आपली स्वतःची काळजी घेतली तर ती काळजी आपल्या गावाची, शहराची व सर्वांची घेतल्यासारखे होईल. त्यामुळे यापुढे लॉकडाउन नको असेल तर प्रत्येकाने कोरोना नियमांचे पालन केले पाहिजे.
प्रतिबंधात्मक उपाय
प्रत्येक नागरिकाने कोरोनाचे सर्व नियम काटेकोरपणे पाळावेत
आठवडा बाजार, दुकानात लस घेतल्याशिवाय प्रवेश देऊ नये
मास्क नसेल तर नियमितपणे दंड करावा
राजकीय मेळावे, सण-समारंभ, लग्नकार्य यामध्ये नियमांचे पालन होत नसेल तर कडक कारवाई व्हावी
कोणत्याही प्रकारे लसीकरणाची टक्केवारी वाढवावी
नागरिकांनी नियमांच्या सक्तीपेक्षा स्वतःची काळजी स्वतः घ्यावी
0 Comments