अरे बापरे.., सोलापूरात फ्रुट बियरमध्ये माणसाच्या विष्ठेतील "कोलीफॉर्म बॅक्टेरिया"
सोलापुरात पूर्व भागात खुलेआम विकल्या जाणाऱ्या फ्रूट बीअरमध्ये चक्क ड्रेनेजच्या पाण्याचा वापर केल्याचे आढळले आहे. प्रयोगशाळेच्या अहवालावरून अन्न प्रशासनाने फ्रूट कंपनी व विक्रेत्यांवर जेलरोड व वळसंग पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल केले आहेत.
सोलापूरात केवळ 20 ते 30 रुपयांमध्ये फ्रुट बियर नावाचे पेय विक्री केले जाते, स्वस्तात नशा होत असल्याने त्याला पूर्व भागातील सर्वाधिक कामगार वर्ग बळी पडतो, एक प्रकारे विषच विकले जाते, या व्यवसायावर अनेक जण गबरगंड झाले आहेत.
अन्नासुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दत्त नगरातील गिरी झोपडपट्टीतील ओम साई ड्रिंक्सचा मालक बलराम बंदाराम, नीलम नगरातील गंडे चौकातील विक्रेता सुरेश भीमराव विटकर यांच्याविरुद्ध दोन वेगवेगळे गुन्हे जेलरोड पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. तसेच गोदुताई विडी घरकुलमध्ये दुकानात सापडलेल्या फ्रूट बीअरप्रकरणी अन्नसुरक्षा अधिकारी रेणुका पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून साई ड्रिंक्सचे अमरसिद्ध पिंडीपोल, शिवराज चिंचोळ यांच्याविरुद्ध वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त प्रदीपकुमार राऊत यांच्याकडे शहरात विक्री होणाऱ्या फ्रूट बीअरमध्ये धोकादायक पदार्थांची भेसळ होत असल्याची तक्रार आली होती. त्यानुसार त्यांनी फ्रूट बीअर विक्रीच्या दुकानावर छापे मारून नमुने घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार २५ ऑगस्ट रोजी गिरी झोपडपट्टी व कुंभारीतील गोदुताई विडी घरकुलमधील पाच फ्रूट बीअर विक्रीच्या दुकानांवर धाडी टाकण्यात आल्या होत्या. या दुकानांमधील ६०८ बाटल्या जप्त करून नमुने तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेकडे पाठविले होते. कारवाईत अन्नसुरक्षा अधिकारी भारत भोसले, प्रज्ञा सुरसे, उमेश भुसे, प्रशांत कुचेकर यांनी भाग घेतला होता. प्रयोगशाळेने धक्कादायक अहवाल दिला. फ्रूट बीअरमध्ये मानवी आरोग्यास अपायकारक अंश असल्याचे नमूद केले.
फ्रूट बीअरच्या नमुन्यात क्वालिफॉर्मचा (शौचामधील घटक) घटक आढळला. हा घटक मानवी विष्ठा किंवा आतड्यात असतो. फ्रूट बीअरमध्ये या पदार्थाचा अंश येणे खूपच घातक आहे. अशी बीअर तयार करणाऱ्यांनी चक्क ड्रेनेजचेच पाणी वापरले असल्याची शक्यता सहायक आयुक्त राऊत यांनी व्यक्त केली. हा घटक मानवी आरोग्याला अत्यंत घातक असल्याने फ्रूट बीअर कंपनीचा मालक व विक्रेत्यांविरुद्ध कलम ३२८ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
0 Comments