google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 महावितरणचे ' स्मार्ट मीटर ' ! आता ग्राहकांना मिळणार प्रीपेड वीज

Breaking News

महावितरणचे ' स्मार्ट मीटर ' ! आता ग्राहकांना मिळणार प्रीपेड वीज

 


महावितरणचे ' स्मार्ट मीटर ' ! आता ग्राहकांना मिळणार प्रीपेड वीज वीजचोरी आणि थकीत वीज देयकांच्या समस्येतून कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी लवकरच शहरातील सर्वच वीज ग्राहकांच्या घरात स्मार्ट मीटर बसविण्यात येणार आहे .

सोलापूर : शहरातील थकबाकीदारांची वाढत चाललेली संख्या पाहता महावितरणसमोर वसुलीचा प्रश्‍न उभा आहे.त्यामुळे महावितरण प्रशासनाकडून ज्या ग्राहकांचे वीजबिल थकीत आहे, अशा ग्राहकांचा वीजपुरवठा  खंडित करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याबरोबरच वीज चोरीमुळे देखील महावितरण प्रशासनाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. दरम्यान, वीजचोरी आणि थकीत वीज देयकांच्या समस्येतून कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी लवकरच शहरातील सर्वच वीज ग्राहकांच्या घरात स्मार्ट मीटर  बसविण्यात येणार असल्याची माहिती महावितरणच्या विश्‍वसनीय सूत्रांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.


स्मार्ट वीज मीटर लावण्याबाबत केंद्र सरकारकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी सुरवातीला शहरी भागात स्मार्ट मीटर लावले जाणार आहेत. यामध्ये देखील सर्वप्रथम व्यापारी, उद्योजक, हॉटेल व्यावसायिक यांच्याकडे स्मार्ट मीटर लावण्यात येणार आहेत. मीटरमध्ये सीम कार्डप्रमाणे एक चीप असणार आहे. याच माध्यमातून ग्राहकांनी वापरलेल्या विजेची माहिती मिळणार आहे. ग्राहकांच्या खात्यामध्ये किती रक्‍कम शिल्लक आहे, याची सर्व नोंद असणार आहे. त्याचबरोबर वीज चोरीला आळा बसणार आहे.


घरगुती ग्राहकांना प्रीपेड पद्धतीने वीजबिल भरावे लागण्याची शक्‍यता असल्याने खात्यातील रक्‍कम संपली की तत्काळ वीजपुरवठा बंद होणार आहे. घरगुती ग्राहकांना प्रीपेड आणि औद्योगिक व इतर सर्व प्रकारच्या कार्यालयांना पोस्टपेड पद्धतीने वीजबिल येण्याची शक्‍यता महावितरणच्या प्रशासनाकडून वर्तविली जात आहे. स्मार्ट मीटर बसविण्याबाबत वरिष्ठ स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. मागील महिन्यात शहरात वीज चोरी तपासणी मोहिमेत जवळपास 41 ग्राहक आढळून आले आहेत. त्यांच्याकडे थकीत वीजबिलाची रक्‍कम आठ लाख रुपये आहे. तर दंडाची एकूण रक्‍कम दोन लाख रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.


ठळक बाबी

वीज ग्राहकांना प्रीपेड अर्थात पहिले पैसे नंतर वीज या पद्धतीने वीज देण्याची शक्‍यता

केंद्र सरकारच्या आरडीएसएस योजनेतून पूर्णत्वास येणार काम

वीज चोरीला बसणार आळा

थकीत वीजबिल ग्राहकांकडे राहणार नाही

मनुष्यबळाची बचत होण्यास मदत होईल

मीटर रीडिंग घेण्याची आवश्‍यकता भासणार नाही

मीटरमध्ये येणार सीम कार्ड

मीटरमध्ये छेडछाड करता येणार नाही

लिंक लाइनमुळे ग्राहकांना देता येईल चांगली सेवा स्मार्ट मीटरमधील एका बॉक्‍समध्ये असणार 12 ग्राहकांचे स्मार्ट मीटर ग्राहकांना मिळेल अधिक चांगली सेवा आरडीएसएस योजनेतून शहरी भागात लवकरच स्मार्ट मीटर बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे ग्राहकांकडील जुने मीटर काढले जाणार आहेत. स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना अधिक चांगली सेवा देता येणार असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले; जेणेकरून वीजपुरवठा खंडित झाला तर सर्व वीज पुरवठा खंडित न होता केवळ त्या भागातील वीज पुरवठा बंद राहील आणि उर्वरित वीज पुरवठा सुरू राहील, हा त्यामागील मुख्य हेतू असणार आहे. यालाच लिंक लाइन सिस्टीम असे म्हटले जाणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

आकडे बोलतात...

एकूण ग्राहक : 2 लाख 15 हजार

शहरात एकूण सबस्टेशन : 12

एकूण रोहित्रे : 1 हजार 910

शहरातील एकूण फिडर : 286

सोलापूर शहरात नवीन पद्धतीचे प्रीपेड मीटर बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना आणि ग्राहकांना देखील याचा फायदा होणार आहे. सर्वप्रथम शहरात स्मार्ट मीटर लावले जातील. त्यानंतर ग्रामीण भागात लावण्यात येतील.

- चंद्रकांत दिघे, अधीक्षक अभियंता, सोलापूर शहर

Post a Comment

0 Comments