नगरपरिषद निवडणूक : शेकापसाठी अस्तित्वाची तर महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची!
सांगोला (सोलापूर) : सांगोला नगरपरिषदेच्या निवडणूक राजकीय हालचालींना आता वेग आला आहे. शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप) ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर येणारी ही पहिलीच निवडणूक असल्याने 'शेकापसाठी अस्तित्वाची तर महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची' अशी ही निवडणूक असणार आहे. ही नगरपरिषदेची निवडणूक तालुक्याला नवी राजकीय दिशा देणारीच ठरणार आहे. त्यातच उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जुळलेल्या नव्या समीकरणामुळे राजकीय चर्चांना आता उधाण आले आहे.
तालुक्यात या वेळच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर अनेक राजकीय समीकरणे बदलली आहेत. राजकीय आखाड्यातील निवडणुकांत कोणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, हेच सध्या तालुक्यातील राजकारणात दिसून येत आहे. या वेळच्या नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठीही सर्वात अगोदरच शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस पक्षाने ही निवडणूक एकत्रित लढविण्याची घोषणा केली आहे. तर गेल्या वेळच्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्षा व स्वतःही नगरसेविका असलेल्या आनंदा माने यांनी विधानसभेच्या निवडणुकीनंतर आमदार शहाजी पाटील यांची सोबत सोडून सध्या शेतकरी कामगार पक्षासोबत आपल्या युतीची घोषणा केली आहे. त्यामुळे या वेळच्या निवडणुकीसाठीचे पक्ष, पक्षातील नेतेमंडळी या सर्वांची समीकरणेच वेगळी झाली आहेत. त्यातच शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन झाल्याने यांच्या निधनानंतर शेकाप प्रथमच निवडणुकीला सामोरे जाणार आहे. त्यामुळे गेल्या वेळच्या नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये एकमेकांविरोधात लढलेले आज काहीजण हातात हात घालून युतीची, आघाडीची घोषणा करताना दिसत आहेत.
दोस्त दोस्त ना रहा...
विधानसभा निवडणुकीच्या अगोदर स्वर्गीय गणपतराव देशमुख व माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील सर्वच कार्यक्रमात, निवडणुकीत एकत्रित असत. परंतु विधानसभेच्या निवडणुकीवेळी त्यांनी शेकाप विरोधात भूमिका घेत आमदार शहाजी पाटील यांच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. तसेच नगरसेविका आनंदा माने व जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार हे विधानसभेच्या निवडणुकीत शहाजी पाटील यांना आमदार करण्यासाठी प्रयत्न करणारे दोघेही आज आमदार शहाजी पाटील यांची साथ सोडून शेकापसोबत दोस्ताना करीत असल्याचे दिसून येत आहे.
राजकीय समीकरणांबाबत संभ्रम
नुकत्याच झालेल्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने शेकापला पदापासून दूर ठेवण्यासाठी भाजपच्या उमेदवाराला साथ देऊन निवडूनही आणले. त्यामुळे तालुक्यात येणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपची भूमिका काय असेल, हे पाहावे लागणार आहे. पक्षीय राजकारणाबरोबरच व्यक्तिकेंद्रित युती, आघाडीची समीकरणेही जुळणार का? याबाबत चर्चा सुरू आहे.
0 Comments