सकाळी साडेदहा ते पाचपर्यंत शाळा ! एका बेंचवर एकच विद्यार्थी , जाणून घ्या नियमावली
सोलापूर : राज्यातील पाचवी ते बारावीच्या जवळपास एक लाख 10 हजार शाळा उद्यापासून (सोमवारी) सुरु होणार आहेत. त्या शाळांमध्ये अंदाजित सव्वाकोटी विद्यार्थी आहेत. दरम्यान, शालेय शिक्षण विभागाने शाळा सुरु करण्यासंदर्भात दोनदा आदेश काढले, परंतु त्यात वेळेसंदर्भात कोणताही उल्लेख स्पष्टपणे केलेला नाही.त्यामुळे पूर्वीप्रमाणे सकाळी साडेदहा ते सायंकाळी पाचपर्यंत सुरु करण्याचा निर्णय सर्वांनीच घेतला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील माध्यमिक विभागाच्या एक हजार 87 तर खासगी व झेडपीच्या (पाचवीपासून पुढे) एक हजार 462 शाळा आहेत. त्यापैकी सध्या ग्रामीण भागातील एक हजार 923 तर शहरातील 305 शाळा सुरवातीपासून सुरु होतील, असा विश्वास माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भास्कर बाबर यांनी व्यक्त केला. या शाळांमध्ये जवळपास तीन लाख मुले आणि दोन लाख 57 हजार मुली आहेत.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देऊन त्यांचे अध्यापन होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. शाळेत येणे विद्यार्थी तथा पालकांसाठी ऐच्छिक असेल, शिक्षकांनी कोणालाही जबरदस्ती करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. कोरोनापासून मुले सुरक्षित राहतील, याकडे लक्ष देऊन शिक्षकांनी अध्यापन करावे आणि त्यावर मुख्याध्यापकांनी वॉच ठेवावा, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत. 'स्वच्छ शाळा सुंदर शाळा'अंतर्गत जिल्ह्यातील दोन हजार शाळांचे रुपडे पालटले आहे.
विद्यार्थ्यांची उपस्थिती पाहून त्या त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी स्थानिक पातळीवर निर्णय घेऊन त्यांची दोन वर्गात बैठक व्यवस्था करावी. सकाळी साडेदहा ते सायंकाळी पाच यावेळेत शाळा भरणार आहेत.
- दिलीप स्वामी, सीईओ, सोलापूर जिल्हा परिषद
प्रशासनाच्या मुख्याध्यापकांना सूचना
वर्गातील एका बेंचवर एकच विद्यार्थी बसेल
दोन बेंचमध्ये सुरक्षित अंतर असावे
100 टक्के विद्यार्थी उपस्थित राहिल्यास त्यांची दोन वर्गात करावी बैठक व्यवस्था
जे विद्यार्थी शाळेत येणार नाहीत, त्यांना ऑनलाईन पध्दतीने शिक्षण द्यावे
लहान-मोठ्या सुट्ट्यांमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी होणार नाही, याची घ्यावी खबरदारी
गर्दीचे कार्यक्रम व खेळ, उपक्रम घेऊ नयेत
0 Comments