google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 विधान परिषदेसाठी भाजपचेच पारडे जड !

Breaking News

विधान परिषदेसाठी भाजपचेच पारडे जड !

विधान परिषदेसाठी भाजपचेच पारडे जड ! 

राष्ट्रवादीला मिळेना उमेदवार विजयासाठी विरोधकांचे मतदार आपलेसे करण्यासाठी राष्ट्रवादीला तारेवरील कसरत करावी लागणार आहे . त्यामुळे अजूनपर्यंत राष्ट्रवादीकडून कोणीच इच्छुक नसल्याचे बोलले जात आहे .


 सोलापूर : विधान परिषदेच्या आमदारांची मुदत डिसेंबरअखेर संपणार असून, त्यासाठी नोव्हेंबरमध्ये निवडणूक होण्याची शक्‍यता आहेजिल्ह्यात विधान परिषदेसाठी एकूण 410 मतदार असून, त्यामध्ये शिवसेना , कॉंग्रेस  व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे  जवळपास 110 तर भाजपकडे  300 मतदार आहेत. विजयासाठी विरोधकांचे मतदार आपलेसे करण्यासाठी राष्ट्रवादीला तारेवरील कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे अजूनपर्यंत राष्ट्रवादीकडून कोणीच इच्छुक नसल्याचे बोलले जात आहे.


सोलापूर जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. एकेकाळी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून विधान परिषदेची उमेदवारी मिळावी म्हणून रस्सीखेच होत होती. मात्र, मोदी लाटेत राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याचा बुरूज ढासळला. माळशिरस विधानसभा मतदारसंघातून राम सातपुते यांच्या रूपाने प्रथमच भाजपने पाय रोवले. त्यानंतर रणजितसिंह मोहिते-पाटील हे भाजपकडून आमदार झाले. मंगळवेढ्याचे समाधान आवताडे यांनाही भाजपने पोटनिवडणुकीत उमेदवारी दिली आणि पंढरपूर- मंगळवेढ्याचे ते आमदार झाले. बार्शीत आमदार राजेंद्र राऊत यांचे वजन वाढले आहे. अक्‍कलकोट तालुक्‍यात सचिन कल्याणशेट्टी यांनी जम बसविला आहे. दक्षिण सोलापूरमध्ये माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख तर शहर उत्तरमधून माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी आपले वर्चस्व कायम राखले.


महापालिकेवर भाजपचीच सत्ता आहे. जिल्ह्यातील मोठमोठ्या नगरपरिषदा, पंचायत समित्या, नगरपालिकांमध्ये भाजपचेच नगरसेवक अधिक आहेत. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजप उमेदवाराचा पराभव करणे महाविकास आघाडीला तितके सोपे नसणार आहे. या पार्श्‍वभूमीवर माजी आमदार राजन पाटील, दीपक साळुंखे, महेश कोठे यांच्यासह काही नेत्यांनी विधान परिषदेची उमेदवारी नको म्हणत लांब राहणेच पसंत केल्याचे बोलले जात आहे. परंतु, राजकारणात अशक्‍य असे काहीच नसते, त्यामुळे महाविकास आघाडीला चमत्काराची आशा आहे. आता राष्ट्रवादीकडून विधान परिषदेचा नवीन उमेदवार कोण, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधान परिषदेसाठी जिल्ह्यात विरोधकांच्या तुलनेत महाविकास आघाडीचे संख्याबळ (मतदान) कमी आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून उमेदवारीसाठी अजूनपर्यंत कोणी इच्छुक असल्यास कळविले नाही.

- बळिराम साठे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस, सोलापूर

मतदानाचा 'यांना' असतो अधिकार

महापालिकेचे नगरसेवक (107), नगरपालिका, नगरपरिषदा व नगरपंचायतींचे नगरसेवक (224), जिल्हा परिषदेचे सदस्य (68), पंचायत समित्यांचे सर्व सभापती (11) हे या विधान परिषदेसाठी मतदार असतात. या सर्वांच्या मतदानानंतर ज्या उमेदवारास सर्वाधिक मते मिळतात, तो विधान परिषदेचा आमदार म्हणून घोषित केला जातो. भाजपकडून आमदार प्रशांत परिचारक यांचेच नाव निश्‍चित आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादीकडून अजूनपर्यंत माजी आमदार दिलीप माने यांचीच चर्चा आहे. परंतु, सध्या ते शिवसेनेत असून उमेदवारी घोषित होण्यापूर्वी त्यांना राष्ट्रवादीत पक्षांतर करावे लागणार आहे.

Post a Comment

0 Comments