जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी घेतले महत्वाचे दोन निर्णय ; काढले आदेश
सोलापूर ग्रामीण भागातील सर्व पोलीस ठाणे आवारात पोलीस विभाग , महसूल विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग यांनी अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक प्रकरणी कारवाई करून जप्त केलेली वाळू व वाहने मोठ्या प्रमाणावर पडून आहेत. या वाळूचा लिलाव करण्यात येणार असून सामील होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्याकडून करण्यात आले आहे.
वाळूची चोरी होऊ नये, पावसाच्या पाण्यामुळे वाहून जावू नये, वाळू वाहून जाऊन मातीत मिसळू नये आणि शासनाचे नुकसान होऊ नये व शासनास त्यातून मोठ्या प्रमाणात महसूल मिळावा म्हणून जप्त केलेल्या वाळूची महसूल विभागाने लिलाव प्रक्रीया सुरू केली आहे.
जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे आवारात एकूण 1616.05 ब्रास वाळू असून अंदाजे किंमत 64,60,000/- रूपये आहे. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी या लिलावामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच जिल्ह्यात (पोलीस आयुक्तालय हद्द वगळून) दिपावली सणाकरीता शोभेच्या दारू विक्रीचे ( फटाके विक्रीचे) तात्पुरते परवाने अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालय, सोलापूर यांचेकडून देण्यात येत आहेत.तात्पुरत्या परवान्यासाठी विहित नमुन्यातील (AE-5) अर्ज सेतू कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, सेालापूर येथे उपलब्ध आहेत.
त्यातील माहिती पूर्णपणे भरून त्यासोबत आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे उदा. फोटो, ग्रामपंचायत / नगरपालिका/ नगरपरिषद यांचेकडील विहीत मुद्दयांबाबतचे ना - हरकत प्रमाणपत्र, 18 वर्ष पूर्ण झालेबाबतचा वयाचा पुराव (L.C./ जन्मदाखला) संबंधित जागेचे 7/12 किंवा मिळकत उतारा व नकाशा, जागा मालकाचे संमतीपत्र, अर्जाच्या चौकशीअंती रू.500/- चलनाने भरलेले परवाना फी तसेच यापूर्वी काढण्यात आलेल्या परवान्याची प्रत इत्यादीसह अर्ज दुय्यम चिटणीस शाखा, जिल्हादंडाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे दिनांक 1 ते 15 ऑक्टोबर 2021 पर्यंत सादर करावेत.
परवाने देणेपूर्वी पोलीस विभागाकडून चौकशी होणे आवश्यक असल्याने दिलेल्या मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. तसेच कोव्हिड - 19 या महामारीच्या पार्श्वभूमीवर सदर कामकाजाच्या कोणत्याही टप्प्यावर शासनाकडील प्राप्त निर्देश परवाना मिळण्यासाठी सादर केलेल्या अर्जदारावर बंधनकारक राहील. शासनाच्या निर्देशाप्रमाणे परवाने देणेबाबत परवाना प्राधिकारी अंतिम निर्णय घेतील. याबाबतची संपूर्ण माहिती दुय्यम चिटणीस शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, सोलापूर येथे मिळेल असे, अपर जिल्हादंडाधिकारी शमा पवार यांनी कळविले आहे.


0 Comments