महाविकास आघाडीकडून ' महाराष्ट्र बंद'ची घोषणा अन् शरद पवारांनी केलं आवाहन
सोलापूर : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खीरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतील पक्षांनीे 11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंद पुकारला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे.कायदा हातात न घेता, पोलीसांशी संघर्ष न करता शांततेत रस्त्यावर उतरून हा बंद यशस्वी करा, असं पवारांनी कार्यकर्त्यांना सांगितले.
सोलापूरमधील कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. पवार म्हणाले, काही शेतकरी आपल्या मागण्यांसाठी लखीमपूर येथे रस्त्यावर उतरले होते. शांततेच्या मार्गाने भाजप सरकारविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर भाजप नेत्यांनी गाड्या घातल्या. त्यात आठ लोक मारले गेले. तुमच्या हातात सत्ता दिली, ते लोकांचे भले करण्यासाठी मात्र याचे विस्मरण भाजपला पडले आहे, अशी टीका पवारांनी केली.
शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालण्याचे पाप भाजप सरकारने केले आहे. त्यावरून देशभरात संतापाची लाट आहे. महाराष्ट्रातील सर्व पक्षांनी मिळून शेतकऱ्यांची हत्या करणाऱ्या भाजप सरकारच्या निषेधार्थ 11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंद पुकारला आहे. शांततेच्या मार्गाने, कायदा हातात न घेता, पोलीस यंत्रणेशी संघर्ष न करता कार्यकर्त्यांनी हा बंद यशस्वी करावा, असे आवाहन यावेळी पवारांनी केले.
स्वबळावर लढण्याचा इशारा
पुढील काही महिन्यांत राज्यात महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादीसह काँग्रेस व शिवसेना हे महाविकास आघाडीतील तीन पक्ष एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. त्यावर शरद पवार यांनी सोलापुरात बोलताना भाष्य केलं आहे. सोलापूर महापालिकेतील भाजपविरोधी पक्षांची एकजूट करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. मात्र, सन्मानाची वागणूक न मिळाल्यास स्वबळावर लढण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
महापालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता आली तर सोलापूरला जुने दिवस दाखवायचे असल्याचे सांगत पवार म्हणाले, 'हिंजवडी, मगरपट्टा येथे आय. टी. सेंटर झाल्यामुळे पुणे शहराचं अर्थकारण बदललं. त्यामुळं जे हिंजवडीला होऊ शकते ते सोलापूरमध्ये का घडू शकत नाही.' दरम्यान, या कार्यक्रमात काँग्रेससह शिवसेना, भाजपा व इतर पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.
सरकारी पाहुण्यांची चिंता नाही!
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या घरी आयकर विभागाने गुरुवारी (ता. 7) छापेमारी केली आहे. शुक्रवारीही ही छापेमारी सुरूच आहे. त्यावर बोलताना शरद पवार यांनी सरकारी पाहुण्यांची चिंता आपल्याला नसते, असं वक्तव्य केलं आहे. पवार म्हणाले, काल अजित पवारांच्याकडे सरकारी पाहुणे येऊन गेले, पण पाहुण्यांची चिंता आपल्याला नसते. निवडणुकीच्या आधीही मला ईडीची नोटीस आली होती. मी ईडीच्या ऑफिसला गेलो आणि नंतर महाराष्ट्राने त्यांना येडी ठरवलं, असं म्हणत पवारांनी भाजपचा उल्लेख न करता टोला लगावला.
0 Comments