अकलूजकरांच्या स्वागताला सोलापुरकरांच्या पुन्हा एकदा पायघड्या !
... तर काँग्रेस सोलापूर-जिल्ह्यात पुन्हा एकदा ' सिंह ' म्हणून देईल डरकाळी ?
सोलापूर : दि.०९ सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे नूतन अध्यक्ष म्हणून डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांची निवड झाली. डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांची जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागल्यापासून ते जिल्हाध्यक्षपदाचा पदभार कधी घेणार, यावर काँग्रेसमधील संतुष्ट असंतुष्टांच्या लक्ष लागून होते. डॉ. मोहिते-पाटील गुरुवारी दुपारी पदभार स्वीकारणार असल्याचे घोषित झाले होते. तो दिवस आज उजाडला असून या दिवसाने अकलूजकरांच्या स्वागताला सोलापुरकरांनी पुन्हा पायघड्या घातल्याचे दिसत आहे.सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय पटलावर कधीकाळी सोलापूर जिल्हा ग्रामीण भागावर अकलूज हे वर्चस्वाचं राजकीय केंद्रबिंदू म्हणून पाहिले गेलेले गांव आहेत. सोलापूर शहरातील ज्येष्ठ काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी ग्रामीण भागात हस्तक्षेप करायचा नाही अन् ग्रामीण पदाधिकाऱ्यांनी शहरात हस्तक्षेप न करण्याच्या अलिखित संकेतातून काँग्रेस पक्षाचे आजपर्यंत राजकारण चालत आले आहे.अकलूजकर मोहिते-पाटील घराणे काँग्रेसमध्ये आल्यानंतर त्यांच्या संघटन कौशल्याने जिल्ह्यातील अन्य पक्षातील मंडळीही त्यांच्यासोबत विश्वासाने खांद्याला खांदा लावून राजकारण करीत आली. त्यात प्रामुख्याने मोहोळ, करमाळा, बार्शी या तालुक्यातील ज्येष्ठ मंडळी त्यांच्यासोबत होतीच, कोण कुठल्याही संघटना अथवा पक्षात असले तरी मोहिते-पाटलांचा शब्द शिरसावंद्य मानण्याचा एक काळ होता, तो काळाच्या ओघात इतिहास जमा झाला.
तत्कालीन काळात राजकारणातून समाजकारण अन् समाजकारणातून राजकारण करणारा एक सक्रिय गट जिल्हा ग्रामीण भागात कार्यरत होता, त्यांना सांगोल्याचं नेतृत्व केलेल्या देशमुखांनी पक्षाची भिंत ओलांडून अखेरपर्यंत सहकार्य केले. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात काँग्रेस पक्ष वैभवाच्या शिखरावर होता. समाजात तिला शब्द पाळणारा वर्ग आता काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा आठवणी काँग्रेस पक्षातील काही जेष्ठ नेते मंडळी आजही सांगतात. म्हणणे आहे. अलीकडच्या काळात पक्ष कार्य करीत असताना सामान्य कार्यकर्ते अन् स्थानिक पदाधिकारी यांच्याप्रमाणेच राज्यपातळीवर नेतृत्व करणाऱ्या अकलूजकरांच्या राजकीय आकांक्षा वाढत गेल्या. त्यांनी जिल्हा परिषद जिल्हा मध्यवर्ती बँक या महत्त्वाच्या संस्था आपल्या ताब्यात ठेवण्याबरोबरच सोलापूर शहर आणि जिल्ह्याला एकत्र करून राजकारण केलं त्यातूनच दुखावलेले काही नेते विरोधी गटांच्या डेरेदाखल झाले.
अकलूजकरांनी राजकीय इच्छाशक्तीतून वेगवेगळ्या वाटा निश्चित केल्यानंतर मोहिते-पाटील समर्थकांनी खुल्या रितीने तसेच पडद्याआडून सहकार्य करीत मोहिते-पाटील यांना सोलापूर जिल्ह्याचे खासदार म्हणून निवडून देण्याचा 'प्रताप' ही सोलापूरकरांनी केला होता.त्यावेळी काँग्रेस पक्षाचा उमेदवार पराभूत झाला. त्या क्षणापासून सोलापूर शहर आणि जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला उतरती कळा लागली. सोलापूर जिल्ह्यातील मुत्सुद्दी नेतृत्व म्हणून राज्य आणि केंद्रीय मंत्रीमंडळात मंत्रीपद भूषविलेले 'सुशिल' नेतृत्वही काँग्रेस पक्षाला आलेली अवकळा दूर करण्यात कमी पडले की काय असा सवाल काँग्रेस जनांतून विचारला जात आहे. अगदी अलिकडे झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत राखीव गटातील चेहरा अशी नेहमी ओळख सांगणाऱ्या देशपातळीवरील नेतृत्वाला पराभव पचवावा लागला. राजकीय पटलावर एकदा पराभव झाला तर दुसऱ्यांदा दुप्पट तयारीने लढावे लागते, हा लढाईचा नियम आहे. तरीसुद्धा राखीव जागेवर थांबूनसुद्धा दुसऱ्यांदा पराभव झाल्याने तो पराभव ज्येष्ठांच्या जिव्हारी लागला, हे मात्र खरे आहे. राजकारण हा एक प्रवाह आहे. या प्रवाहात कोण कोणत्या पक्षाचा - संघटनेचा समर्थक असावे, हा ज्याचा-त्याचा संवैधानिक अधिकार आहे. या अधिकारातून कोणी या गोटातून त्या गोटात गेला तर फारसे मनाला लाऊन घेण्याचे कारण नाही.
सध्या सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघ म्हणजे काँग्रेस अन् काँग्रेस म्हणजे सोलापूर शहर मध्य इतकीच ओळख कायम ठेवण्यात काँग्रेस पक्षाचा एक गट सक्रिय आहे. प्रत्येक पक्षात संतुष्ठ-असंतुष्ठ गट असतात. या नव्या निवडीनंतर जे पदभार घेतील ते 'धवल ' पक्ष कार्य करीत, पक्षाच्या उतरत्या प्रकृतीवर ' डॉक्टर ' या नात्याने इलाज करतील, अशी प्रामाणिक अपेक्षा आहे. खरे तर कोणी विचारवंताने म्हटले आहे, ' नाटकातील पात्र, सिनेमातली चित्र आणि राजकारणातले मित्र खरे नसतात ' आता 'सही टाईम, सही ईलाज' झाला तर काँग्रेस सोलापूर-जिल्ह्यात पुन्हा एकदा ' सिंह ' म्हणून डरकाळी देईल. बस इतकेच !
0 Comments