' या ' तालुक्यांतील दुकानांना सहापर्यंत परवानगी : पालकमंत्री भरणे
कोरोनाच्या पहिल्या लाटेत ऑक्सिजनसाठी खूप कष्ट घ्यावे लागले. मात्र दुसऱ्या लाटेत आणि संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी जिल्हा प्रशासनाने उत्कृष्ट तयारी केली आहे. सोलापूर : कोरोनाच्या पहिल्या लाटेत ऑक्सिजनसाठ खूप कष्ट घ्यावे लागले.मात्र दुसऱ्या लाटेत आणि संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी जिल्हा प्रशासनाने उत्कृष्ट तयारी केली आहे. पंढरपूर , करमाळा आणि माळशिरस तालुक्यातील ऑक्सिजन प्लान् नागरिकांच्या सेवेसाठी तयार झाले आहेत. यामुळे मुबलक ऑक्सिजन मिळू शकणार आहे. तरीही प्रत्येक तालुक्यात ऑक्सिजन प्लान्ट तयार करण्याच्या सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केल्या आहेत.
सोलापुरातील सातरस्ता येथील नियोजन भवनात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. पालकमंत्री भरणे म्हणाले, संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत जिल्हा प्रशासन सज्ज आहे. बेडची क्षमता वाढविण्यात आली असून औषधसाठा मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आला आहे. रुग्णसंख्या कमी होण्यास पाच तालुक्यात संचारबंदी लागू केल्याचा फायदा झाला. या तालुक्यात आता सहा वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याच्या सूचनाही पालकमंत्री भरणे यांनी दिल्या. नागरिकांनी गणपती उत्सवामध्ये गर्दी करू नये. शांततेत घरीच विसर्जन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रशासनाने गणपती विसर्जनाची तयारी पूर्ण केली असून नागरिकांनी काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
सध्या 1 हजार 910 रुग्ण ग्रामीण भागात तर 19 सोलापूर शहरात असे एकूण 1 हजार 929 कोरोनाचे रुग्ण उपचार घेत आहेत. आयसोलेशन बेड 23 हजार 658 तर ऑक्सिजनच्या 4 हजार 819 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. माझे मूल- माझी जबाबदारी अंतर्गत सहा लाख सात हजार 393 मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यापैकी 665 मुले कोविडसदृश लक्षणे असलेली तर 73 मुले कोविडबाधित असल्याचे आढळले. सर्वांवर उपचार केले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांनी दिली. ऑक्सिजनचे सात प्रकल्प सुरू झाले असून पंढरपूर, करमाळा आणि माळशिरस येथील प्रकल्प नव्याने सुरू झाले आहेत. 10 साठवण टॅंकही कार्यान्वित झाले आहेत. म्युकरमायकोसिसचे केवळ 21 रुग्ण सध्या उपचार घेत असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांनी दिली.
0 Comments