मी शेकाप सोडणार नाही : गणपतराव देशमुखांच्या सहकाऱ्याने केले स्पष्ट
विधानसभा निवडणुकीत पक्ष देईल तोच उमेदवार असेल.
सांगोला (जि. सोलापूर) : शेतकरी कामगार पक्ष मी कदापि सोडणार नाही. शेकाप पक्षाबरोबर ओबीसी ऑर्गनायझेशन संघटनेचे काम करणार आहे. शेकापच्या येणाऱ्या अधिवेशनात तालुका चिटणीस मंडळाला नवा तरुण चेहरा देणार असल्याचे शेकापचे ज्येष्ठ नेते आणि जिल्हा परिषदचे माजी सदस्य बाबा करांडे यांनी स्पष्ट केले.
गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व शेकापचे ज्येष्ठ नेते बाबा करांडे पक्ष सोडणार असल्याची चर्चा सगळीकडे सुरू होती. पण, आज त्यांनी सांगोला येथे पत्रकार परिषद घेत शेकाप पक्ष सोडणार नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे त्यांच्या पक्षांतराच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
या पत्रकार परिषदेत बाबा करांडे म्हणाले की, मी आबासाहेबांच्या (गणपतराव देशमुख) विचारांची प्रेरणा घेऊनच राजकारणात आलो व स्थिरावलो. शेकाप हा बौद्धिक क्षमता असलेल्या कार्यकर्त्यांची केडर बेस पार्टी आहे. ज्यांनी शेकापचा विचार अंगीकारला, ज्यांनी कर्तृत्व सिद्ध केले, ज्यांनी मतदारांच्या मनात स्थान निर्माण केलं, तोच आमदार होईल. विधानसभा निवडणुकीत पक्ष देईल तोच उमेदवार असेल. सांगोला येथे 25 व 26 सप्टेंबर रोजी होणाऱ्या शेकापच्या अधिवेशनात चिटणीस मंडळाला नवा चेहरा देणार असून त्यांच्यासोबत दहा सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. परंतु नवे चिटणीस मंडळ तरुणांचे असणार आहे. नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये आबासाहेबांच्या इच्छेप्रमाणेच आघाडी करून निवडणूक लढविली जाईल, असेही बाबा करांडे यांनी सांगितले.
0 Comments