अल्पवयीन मुलीवर गँगरेप : चौघांना अटक
नागपूर : कुटुंबात झालेल्या वादानंतर घराबाहेर पडलेल्या अल्पवयीन तरुणीवर ऑटो चालकासह चौघांनी गँगरेप केल्याची संतापजनक घटना उपराजधानीत घडल्याने खळबळ उडाली . या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करीत चौघा आरोपींना अटक केली आहे . सूत्रांच्या माहितीनुसार , 29 जुलैच्या रात्री पीडीतेला वहिनीने रागावल्याने ती घराबाहेर पडली . मेडिकल चौकातून तिने एका ओळखीच्या ऑटोचालकाला सीताबर्डीला सोडण्यास सांगितले . त्याने तिला मानस चौकात सोडून दिले . तिथे दुसरा ऑटोचालक साना याची तिच्यावर नजर पडली . त्याने मदतीचा हात पुढे करून तिला ऑटोत बसविले व मोमिनपुऱ्यात घेऊन गेला . तिला दारू पाजली . एका खोलीत घेऊन गेला व तीन मित्रांना पुन्हा बोलावले . आरोपी सानासह अन्य तिघांनी तिच्यावर अत्याचार केला . त्यानंतर तिला पुन्हा मेयो रुग्णालयासमोर सोडून दिले . तिथे दोन ऑटोचालकांची तिच्यावर नजर पडली . त्यांनीसुद्धा तिच्यावर अत्याचार केला व पसार झाले . ती मेयो रुग्णालय चौकात मदत मागत असताना दोघांनी आपल्या गाडीवर तिला रेल्वे स्टेशनवर सोडले . रात्री उशिरा जीआरपीच्या गस्त घालणाऱ्या पथकाला ती रेल्वे स्टेशनवर आढळली . त्यांनी तिला महिला बालगृहात पाठविले . तिथे बाल कल्याण समितीपुढे अत्याचार झाल्याचे तिने सांगितले . समितीच्या सूचनेनुसार जीआरपीने तिचा जबाब नोंदवून घेतला . पीडित मुलीवर यापूर्वीही इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अत्याचार झाला होता . अनेक दिवस महिला बालगृहात राहिल्यानंतर ती घरी परतली होती परंतु घरच्यांचा तिच्यासोबत नेहमीच वाद होत होता .


0 Comments