जिरायती दोन एकर तर बागायती 20 गुंठे खरेदीवर निर्बंध! अशी करता येईल खरेदी
सोलापूर : राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डीकर यांनी काढलेल्या नव्या आदेशानुसार राज्यातील जिरायती क्षेत्र दोन एकर तर बागायती 20 गुंठे क्षेत्र असल्यास त्यातून तुकडे करून जमीन विकताना यापुढे सक्षम प्राधिकरणाची (जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी) परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे. राज्यातील जमिनीचे तुकडीकरण थांबवून पुढील वादविवाद व गुंतागुंत कमी व्हावी, या हेतूने आता दोन एकर जिरायती जमिनीतून तुकडे पाडून जमीन विकण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. तर बागायती जमिनीसाठी 20 गुंठ्यांची मर्यादा घालून देण्यात आली आहे. संबंधित खरेदी-विक्री व्यवहारासाठी सक्षम प्राधिकरणाची परवानगी असल्याशिवाय आता व्यवहार करता येणार नाहीत.सद्य:स्थितीत एखाद्या सात-बारा उताऱ्यावरील बागायती जमीन 20 गुंठ्यापेक्षा कमी असेल अथवा जिरायती जमीन दोन एकरापेक्षा कमी असल्यास त्याची खरेदी-विक्री करतानाही परवानगी बंधनकारकच असणार आहे. या नव्या परिपत्रकामुळे अनेकांसमोरील अडचणी वाढल्याने हा निर्णय रद्द करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. तर दुसरीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खरेदी-विक्रीच्या व्यवहारात घट झालेली असतानाच या नव्या आदेशामुळे राज्याच्या महसुलावर विपरीत परिणाम झाल्याची स्थिती आहे. तूर्तास, नव्या आदेशाची अंमलबजावणी 12 जुलैपासून काटेकोरपणे सुरू झाली आहे.
आदेशातील ठळक बाबी...
एखाद्या गटात (सर्व्हे नंबरमध्ये) दोन एकर जमीन आहे, त्यातील काही पाच-दहा गुंठे खरेदी करता येणार नाही काही गुंठ्यांची खरेदी करताना त्या सर्व्हे क्रमांकाचा ले-आउट करून त्या गुंठे खरेदीला जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी ज्या व्यक्तीने प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी तुकड्यांची खरेदी घेतली असल्यास त्याची खरेदी-विक्री करण्यासाठीही घ्यावी लागेल परवानगी फार वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या तुकड्याची शासन भूमी अभिलेख विभागामार्फत हद्दी निश्चित होऊन तथा मोजणी होऊन त्याचा स्वतंत्र हद्द आणि नकाशा तयार झाला असल्यास त्या क्षेत्राच्या व्यवहारासाठी परवानगीची गरज राहणार नाही तुकडे बंदी, तुकडे जोड कायद्याअंतर्गत नोंदणी विभागाचे महानिरीक्षकांनी काढलेल्या नव्या परिपत्रकानुसारच खरेदी-विक्रीचे व्यवहार होतील. परवानगीशिवाय खरेदी-विक्रीचे व्यवहार करता येणार नाहीत.
- गोविंद गिते, जिल्हा मुद्रांक शुल्क अधिकारी, सोलापूर


0 Comments