"अमर रहे.. अमर रहे, आबासाहेब अमर रहे'च्या घोषणांनी आबांना अखेरचा लाल सलाम
सांगोला (सोलापूर) : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात सांगोला सूत गिरणीच्या प्रांगणात अत्यंसंस्कार करण्यात आले. "अमर रहे..अमर रहे, आबासाहेब अमर रहे'च्या घोषणांनी परिसर दुमदमून गेला होता. सोलापूरहून सकाळी सहाच्या दरम्यान पार्थिव पेनूर या त्यांच्या गावी अंत्यदर्शनासाठी नेण्यात आले. सकाळी नऊ वाजता त्यांचे पार्थिव सांगोला तालुक्यातील संगेवाडी येथे आले. सांगोल्यात प्रथम मार्केट कमिटीच्या प्रांगणात व नंतर आबासाहेबांच्या निवासस्थानी दर्शनासाठी ठेवण्यात आले. त्यांच्या निवासस्थानापासून सूतगिरणीपर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यांनतर सूतगिरणी मध्ये थोडावेळ अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात आले. सूतगिरणीच्या प्रांगणात त्यांचे चिरंजीव पोपट देशमुख यांच्या हस्ते आबासाहेबांच्या पार्थिवाला अग्नी देण्यात आला. या वेळी त्यांच्या पत्नी रतनबाई, मुलगा चंद्रकांत देशमुख, मुलगी शोभा, नातू डॉ. बाबासाहेब देशमुख, डॉ. अनिकेत देशमुख व कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते.या वेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील, आमदार शहाजीबापू पाटील, आमदार जयंत पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार बबनराव शिंदे, आमदार समाधान अवताडे, आमदार प्रशांत परिचारक, आमदार सुमन पाटील, आमदार अनिल बाबर, माजी मंत्री आण्णासाहेब डांगे, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार अनिल बाबर, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, माजी मंत्री व आमदार महादेव जानकर, माजी मंत्री राम शिंदे, सांगलीचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी, माजी आमदार दीपक साळुंखे- पाटील, माजी आमदार प्रकाश शेंडगे, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार रामहरी रूपनर, नगराध्यक्षा राणी माने, भाजप तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार, सभापती राणी कोळवले, माजी नगराध्यक्ष ऍड. पृथ्वीराज चव्हाण, भाजप किसान सेलचे शशिकांत देशमुख, कल्याणराव काळे, भाजप जिल्हा सरचिटणीस शिवाजी गायकवाड, बाबूराव गायकवाड, तानाजी पाटील, रफिक नदाफ, सागर पाटील, डॉ. संदीप देवकते, मारुती बनकर, पांडुरंग पांढरे, भारत बनकर, डॉ. प्रभाकर माळी, भाऊसाहेब रूपनर, अप्सरा ठोकळे, भरत शेळके, आनंदा माने, वैभव नायकवडी, रुक्मिणी गलांडे, धैर्यशील मोहिते- पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलिस अधीक्षक ग्रामीण तेजस्वी सातपुते यांच्यासह जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्य, अधिकारी, पदाधिकारी, पंचायत समितीचे सदस्य विविध गावचे सरपंच व आबासाहेबांवर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.आबासाहेबांचे पार्थिव तालुक्यात येण्याअगोदरच सांगोला शहर व तालुक्यातील जवळजवळ सर्वच बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या. आबासाहेबांची अंत्ययात्रा निघणाऱ्या रस्त्यावर सर्वत्र रांगोळी व फुलांची उधळण करण्यात आली होती. रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांची मोठी गर्दी होती. आबासाहेबांच्या अंत्यसंस्काराच्या अगोदर पार्थिवावर लपटलेला तिरंगा पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या हस्ते आबासाहेबांच्या पत्नी रतनबाई यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
0 Comments