सोलापूरचे कारभारी होण्यासाठी दोन मामांमध्ये चढाओढ!या दोन्ही मामांचे सूर जुळत नसल्याने सोलापूर जिल्ह्याची राष्ट्रवादी चाचपडू लागली आहे.
सोलापूर : करमाळ्याचे आमदार संजय शिंदे आणि इंदापूरचे आमदार तथा राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे हे दोघेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक आहेत. दोघांनीही जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या माध्यमातून आमदारकी मिळविली. या दोघांनाही मामा नावानेच ओळखले जाते. सोलापूर जिल्ह्याच्या राष्ट्रवादीत हे दोन मामा सध्या कार्यरत आहेत. या दोन्ही मामांचे सूर जुळत नसल्याने सोलापूर जिल्ह्याची राष्ट्रवादी चाचपडू लागली आहे. संधी मिळूनही इंदापूरचे मामा सोलापूरच्या राजकारणात फारसे लक्ष घालत नाहीत, तर क्षमता असूनही निमगावच्या मामांना मंत्रिपदाची संधी का मिळत नाही, असा सूर त्यांच्या समर्थकांकडून आळवला जात आहे.पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांचा जास्तीत जास्त कालावधी हा सोलापूरवरील कोरोनाचे संकट दूर करण्यातच गेला. त्यातही कोरोना प्रश्न हाताळण्यात त्यांना आलेल्या अपयशाचीच चर्चा जास्त झाली. सोलापूर जिल्ह्यासाठी भरीव योगदान देण्यात पालकमंत्री भरणे आजपर्यंत तरी यशस्वी झालेले दिसत नाहीत. सोलापूर जिल्ह्याचे आणि विशेषतः जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे गटातटाचे राजकारण अद्यापही भरणे यांना समजलेले दिसत नाही. त्यामुळे कोणाची कामे केली, तर कोण नाराज होईल, याचे राजकीय गणित बहुधा त्यांच्या लक्षात आलेले नाही. आगामी काळात होणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि विधान परिषद निवडणूक यासाठी पालकमंत्री भरणे यांना जिल्ह्यातील गटातटाचा अभ्यास करावा लागणार आहे. उजनी धरणातून इंदापूरला पाच टीएमसी पाणी नेण्याचा विषय रद्द करायला लावण्यात आमदार संजय शिंदे यांनी मोलाची व निर्णायक भूमिका बजावली. सोलापुरातील सिद्धरामेश्वरांच्या यात्रेचा विषय असो की अरण (ता. माढा) येथील गेल्या वर्षीचा नारळहंडी उत्सव हे विषय मार्गी लावण्यात आमदार शिंदे यांनी नेतृत्वाची भूमिका पार पाडली. उजनी परिसरातील पर्यटनाचा विषय असो की सोलापूर जिल्ह्यातील भीमा, सीना, नीरा या नद्यांवरील कोल्हापुरी बंधाऱ्यांचे रुपांतर बॅरेजमध्ये करण्याचा विषय आमदार शिंदे यांनी सोलापूर जिल्हा डोळ्यासमोर ठेवून सत्तेच्या माध्यमातून जिल्ह्याचे प्रश्न हाती घेतले आहेत. विधान परिषद निवडणूक, जिल्हा परिषद निवडणूक यांसह सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात आमदार शिंदे हे चमत्कार घडवू शकतात, असा त्यांच्या समर्थकांकडून दावा केला जातो. आमदार शिंदे यांचे राजकीय कौशल्य आगामी काळात राष्ट्रवादीला कामी येऊ शकते. सोलापूरला स्थानिक पालकमंत्री मिळावा, ही मागणी पुन्हा होऊ लागली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर आता राज्याच्या मंत्रिमंडळाच्या खांदेपालटाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या खांदेपालटामध्ये आमदार शिंदे यांना संधी मिळावी, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. इतिहास माढ्याचा, पराभूतांच्या मंत्रिपदाचा माढा लोकसभा मतदारसंघात पराभूत झालेला प्रमुख प्रतिस्पर्धी राज्य सरकारमध्ये मंत्री होत असल्याच्या घटना एकदा नव्हे; तर तीनदा घडल्या आहेत. माढ्यातून 2009 मध्ये पराभूत झालेले भाजपचे तत्कालिन उमेदवार सुभाष देशमुख व अपक्ष उमेदवार महादेव जानकर यांना राज्यात मंत्रिपदाची संधी मिळाली. माढ्यातून 2014 मध्ये पराभूत झालेले महायुतीचे तत्कालिन उमेदवार सदाभाऊ खोत यांनादेखील संधी मिळाली. माढ्यातून 2019 मध्ये राष्ट्रवादीचे तत्कालिन उमेदवार संजय शिंदे पराभूत झाले आहेत. भाजपने माढ्याला नेहमीच प्राधान्य दिले आहे. त्यामुळे माढ्यातून पराभूत झालेल्या तब्बल तिघांना राज्यात मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. राज्यात आता राष्ट्रवादीची सत्ता आहे. राष्ट्रवादी माढ्याला प्राधान्य देणार का? माढ्यातील पराभूतांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याचा इतिहास कायम राहणार का? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
0 Comments