सोलापूर शहरात जुलै ते सप्टेंबरचे मोफत अन्नधान्य अंत्योदय,प्राधान्य कुटुंबातील प्रतिसदस्य मिळणार ०५ किलो धान्य
सोलापूर : कोरोना विषाणूच्या प्रार्दुभावामुळे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत प्राधान्य कुटुंब आणि अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थ्यांसाठी जुलै ते सप्टेंबर २०२१ या महिन्यासाठी प्रति सदस्य ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ असे ५ किलो अन्नधान्य प्रतिमाह मोफत वाटप करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती अन्नधान्य वितरण अधिकारी अप्पासाहेब समिंदर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.सोलापूर शहरामध्ये परिमंडळ अधिकारी अ,ब,क आणि ड विभाग यांच्या अधिनस्त असणाऱ्या ३१४ रास्त भाव धान्य दुकानदारामार्फत अंत्योदय अन्न योजनेचे २५ हजार आणि प्राधान्य कुटुंबातील ४ लाख ९५ हजार असे एकूण ५ लाख २० हजार लाभार्थ्यांना धान्य वाटप करण्यात येणार आहे. यानुसार ७८०० मेट्रीक टन गहू आणि ५२०० मेट्रीक टन तांदूळ मोफत वाटप करण्यात येत आहे.लाभार्थ्यांनी धान्य मोफत घेतल्याची पावती दुकानदाराकडून घ्यावी. रास्त भाव दुकानदाराकडून मंजुरीपेक्षा कमी धान्य आणि पावती न दिल्यास परिमंडळ अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचे आवाहन समिंदर यांनी केले आहे.
0 Comments