स्टेट बँक ऑफ इंडिया ( SBI ) , एचडीएफसी बँक ( HDFC ) , आयसीआयसीआय बँक ( ICICI ) आणि बँक ऑफ बडोदाच्या ( BOB ) ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे .
या बँकांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी ( Senior Citizen ) अधिक व्याजदराची एक विशेष मुदतठेव ( Foxed Deposit ) योजना दाखल केली होती , ती योजना 30 जून 2021 रोजी बंद होणार आहे .
मे 2020 मध्ये या बँकांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी एक खास योजना आणली होती . ठराविक कालावधीसाठी असलेल्या मुदत ठेव योजनेत ज्येष्ठ नागरिकांसाठी लागू असलेल्या व्याजदरापेक्षा अर्ध्या टक्क्याहून अधिक व्याज दर देण्यात आला आहे . त्यामुळे सर्वसाधारण ग्राहकाला मिळणाऱ्या व्याजदरापेक्षा एक टक्का अधिक व्याज ज्येष्ठ नागरिकांना मिळते
या योजनेची अंतिम मुदत 31 मार्च होती . ती 30 जून 2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे . आता ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर फक्त हा महिना बाकी आहे . स्टेट बँक : सध्या स्टेट बँक ( SBI ) पाच वर्षांच्या मुदतीसाठी सामान्य नागरिकांना 5.4 टक्के व्याज देते . मात्र एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने विशेष मुदतठेव योजनेअंतर्गत गुंतवणूक केली तर त्याला 6.20 टक्के दराने व्याज मिळते . ही योजना 5 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी आहे . एचडीएफसी बँक : एचडीएफसी बँक ( HDFC ) ज्येष्ठ नागरिकांसाठी आणलेल्या विशेष मुदतठेव योजनेवर सर्वसाधारण व्याजदरापेक्षा पाऊण टक्का ( 0.75 ) अधिक व्याज देते . एचडीएफसी बँकेच्या सीनियर सिटीझन केअर एफडीअंतर्गत ( Senior Citizen Care FD ) एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने ठेव ठेवल्यास त्याला 6.25 टक्के व्याजदर मिळेल .बँक ऑफ बडोदा ( BOB ) : बँक ऑफ बडोदाच्या विशेष मुदतठेव योजनेअंतर्गत 5 वर्ष ते 10 वर्षांपर्यंतच्या मुदतीसाठी ज्येष्ठ नागरिकांना 6.25 टक्के व्याजदर मिळेल . आयसीआयसीआय बँक : आयसीआयसीआय बँकेनं ( ICICI ) ज्येष्ठ नागरिकांसाठी आयसीआयसीआय बँक गोल्डन इयर्स ( Golden Years Scheme ) ही विशेष योजना सुरू केली आहे . या योजनेत बँक ज्येष्ठ नागरिकांना 0.80 टक्के अधिक व्याज देत आहे . आयसीआयसीआय बँक गोल्डन ईयर्स योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना वार्षिक 6.30 टक्के व्याज दर मिळतो . सध्याच्या काळात व्याजदर कमी होत असताना या बँकांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी आणलेल्या या विशेष योजनांमुळे त्यांना चांगले व्याज मिळणार आहे . व्याजाच्या उत्पन्नावर अवलंबून असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला आहे . कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या या योजनेची मुदत वाढवण्यात आल्यानं याआधी गुंतवणूक करू न शकलेल्या अनेक ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ घेण्याची संधी निर्माण झाली आहे


0 Comments