शेतकऱ्यांमधून तीव्र संताप! इंदापूरला पाणी वळवण्याचा निर्णय अधिकृतरीत्या रद्द करावा; पंढरपुरात टायर पेटवून आंदोलन
सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उजनीच्या पाण्यावरून राज्य सरकारच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. इंदापूरला पाणी वळवण्याचा निर्णय अधिकृतरीत्या रद्द करावा, या मागणीसाठी उजनी धरण पाणी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी आज उपरी (ता. पंढरपूर) येथे पंढरपूर – सातारा राष्ट्रीय महामार्गावर टायर पेटवून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या विरोधात आंदोलन केले.उजनी धरणातून इंदापूरला पाच टीएमसी पाणी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या निर्णयानंतर सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उजनी धरणातून इंदापूरला पाणी देण्यास विरोध केला आहे.शेतकऱ्यांचा वाढता विरोध झाल्यानंतर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मागील आठवड्यात उजनीतून इंदापूरसाठी मंजूर केलेल्या पाच टीएमसी पाण्याचा निर्णय रद्द केल्याचे जाहीर केले आहे.दरम्यान, त्यांच्या या घोषणेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातून उजनी धरणात येणाऱ्या सांडपाण्याचे मोजमाप करण्यासाठी जलसंपदा विभागातील सेवानिवृत्त तीन अधिकाऱ्यांची समिती गठीत केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.सांडपाण्याच्या नावाखाली इंदापूरला मंजूर केलेले पाच टीएमसी पाणी त्वरित रद्द करून तसा शासन आदेश काढावा, या मागणीसाठी आजपासून पाणी संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाभरात आंदोलन सुरू करण्यात आले आहे.आज पंढरपुरात या आंदोलनाची पहिली ठिगणी पडली. पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष अतुल खुपसे, सचिव माऊली हळणवर आणि दीपक वाडदेकर यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे.इंदापूरसाठी मंजूर केलेले पाणी रद्द करावे, अन्यथा यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन केले जाईल असा इशाराही भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव माऊली हळणवर यांनी दिला आहे. हे आंदोलन पुढच्या काळात अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.


0 Comments