सांगोला ( प्रतिनिधी ) : उजनीतून ५ टीएमसी पाणी इंदापूर तालुक्याला नेण्याचा आदेश पारित झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये महा विकास आघाडी सरकार बाबत असंतोष निर्माण झाला होता . महा विकास आघाडीचे अनेक नेते या पाणी प्रश्नाच्या लढाईत सावध भूमिका घेत थेट पवारांना कोणीच दुखावण्याची किंवा अंगावर येण्याचे धाडस करताना दिसत नव्हते .
याबाबत पाणी संघर्ष समितीने आक्रमक आवाज उठवला असला तरी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी मात्र पवार नाराज होणार नाहीत अशीच प्रतिक्रिया देताना दिसत होते . पवारांचा वरदहस्त टिकला पाहिजे आणि जिल्ह्याच्या लढाईत सहभागी असल्याचेही दिसले पाहिजे अशी दुटप्पी भूमिका काही नेत्यांनी घेतली होती . मात्र सांगोला तालुक्याचे शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी याबाबत जिल्ह्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध धारदार भाषाशैलीत पवारांना आव्हान दिले . यावावतीत यांनी पवारांवर जहरी टीका करत असताना जिल्ह्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात गप्प बसणार नसल्याचा इशारा दिला . सरकारमधील घटक पक्षाचे ते आमदार असतानासुद्धा त्यांनी या विषयाबाबत बोलण्याचे धाडस दाखवले . भाजप पक्षाकडून देखील सदर विषयासंदर्भात आंदोलने होत होती . परंतु थेट पवारांवर कोणीच आव्हान देताना दिसत नव्हते . अजित पवार यांनी या घेतलेल्या निर्णयाविरोधात कोणीच नाव घेऊन टीकाटिपणी करताना दिसत नव्हते . एकीकडे पाणी संघर्ष समितीचा संघर्ष चालू असताना दुसरीकडे लोकप्रतिनिधी मात्र जिल्ह्याच्या या लढाईत खांद्याला खांदा लावुन असल्याचे फक्त जाहीर करत होते . पण अशा परिस्थितीत सुद्धा आमदार शहाजीवापू पाटील यांनी पवारांवर निशाणा साधण्याचे सोडले नाही . अन्याय हा अन्याय असतो राजकीय लाभासाठी गप्प बसलो तर आपणच आपल्या जिल्ह्यावर अन्याय करत आहोत .या भावनाच कुणाच्या लक्षात येत नव्हत्या . पण आमदार शहाजीवापू यांनी याबाबत डरकाळी फोडून अन्यायाचा पाढाच वाचून दाखविला . पण ही लढाई अजून संपलेली नाही . जयंत पाटील यांनी सर्वेक्षणाचा आदेश रद्द करण्याच्या सूचना दिल्याचे जाहीर केले आहे . पाणी उचलण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही . त्यामुळे आमदार शहाजीबापू यांची भूमिका इमानेइतबारे निभावली . त्यामुळे बापू व्हा पुढे .... म्हणून चालणार नाही तर बापूंच्या आक्रमकतेला येथील सर्वच लोकप्रतिनिधींनी साद दिली पाहिजे तरच हा लढा सोपा जाईल आणि हक्काचे पाणी वाचेल , अन्यथा लढाईत जिंकलो पण तहात हरलो अशीच म्हणण्याची वेळ जिल्ह्यावर येऊ शकते .


0 Comments