गणपतराव देशमुखांकडून आवताडेंनी घेतले विधानसभेतील कामकाजाचे धडे!आमदार समाधान आवताडे हे विधिमंडळ कामकाजाच्या दृष्टीने अजून नवखे आहेत.
सांगोला : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीतून आमदारपदी विराजमान झालेल्या समाधान आवताडे यांनी राजकारणातील ऋषितुल्य नेतृत्व समजले जाणारे शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार, भाई गणपतराव देशमुख यांची सांगोला येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. देशमुख यांच्या तब्येतीची विचारपूस करत विधानसभेतील कामकाजाचे व विशेषतः पाणीप्रश्नाचे धडे त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न आमदार आवताडे यांनी केला.
मंगळवेढ्याच्या बरोबरीने सांगोला तालुक्याचा काही भागदेखील दुष्काळी होता. या भागाचा दुष्काळ हटवण्याच्या दृष्टीने 13 दुष्काळी तालुक्याच्या पाणी परिषदेच्या माध्यमातून त्यांनी विधीमंडळात संघर्ष केला. त्यांची चिकाटी आणि जिद्दीमुळे सांगोल्याचा पाणीप्रश्न अंतिम टप्प्यात आला. एकाच पक्षात राहून सतत पाण्यासाठी संघर्ष करणारे नेते म्हणून गणपतराव देशमुख यांची ओळख आहे. सांगोल्याच्या दक्षिण बाजूला म्हैसाळ योजनेचे पाणी, तर पश्चिम बाजूला टेंभू योजनेचे पाणी, याशिवाय उजनी आणि नीरा कालव्याचे पाणीदेखील या तालुक्याला मिळण्याच्या दृष्टीने गणपतराव देशमुख यांनी प्रयत्न केले.
सांगोला तालुक्याला पाणी मिळण्याबरोबरच रस्ते, वीज, आरोग्य या प्रश्नांसाठी देखील त्यांनी विधिमंडळात सत्ता असो अथवा नसो आवाज उठला. त्यांच्या आवाजाची दखल सत्तेवर असणाऱ्या पक्षाकडून घेतली जायची. आज वयाच्या 94 व्या वर्षी त्यांच्या तब्येची विचारपूस करावी. आमदारपदी विराजमान झाल्यानंतर त्यांचे विधिमंडळातील कामकाज जाणून घ्यावे, तसेच त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आमदार आवताडे यांनी आज त्यांच्या सांगोल्यातील निवासस्थानी भेट घेत त्यांची विचारपूस केली. मंगळवेढा व सांगोल्याच्या दुष्काळी परिस्थितीचा विचार करता सांगोल्याचा दुष्काळ लवकर हटला. मात्र, मंगळवेढ्याचा दुष्काळ हटवण्याच्या दृष्टीने अजूनही संघर्ष करावा लागणार आहे. सध्या म्हैसाळ योजनेच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असला तरी मंगळवेढा उपसा सिंचन योजना, उजनी कालव्यातील अर्धवट कामे कामे पूर्ण होण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक आहे. विधानसभा निवडणुकीतील दोन पराभवानंतर तिसऱ्या वेळेला आमदारकी पदरात पडलेले आमदार समाधान आवताडे हे विधिमंडळ कामकाजाच्या दृष्टीने अजून नवखे आहेत. त्यांना विधिमंडळातील कामकाज व प्रश्न मांडण्याची शैली, तालुक्यातील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाबरोबर रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण या प्रश्नावर देखील त्यांना उर्वरित तीन वर्षांच्या कालावधीत आक्रमक व्हावे लागणार आहे. त्यासाठी राजकारणातील ऋषितुल्य व्यक्तीमत्व असलेल्या गणपतराव देशमुख यांच्यासारख्या अनुभवी नेतृत्वावाकडून घेतलेले मार्गदर्शन आणि त्यांचे आशीर्वाद हे आवताडे यांच्या भविष्यातील राजकारणासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.


0 Comments