तात्कालीन महसूल कर्मचाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे तालुक्यातील इनाम वर्ग-२ च्या जमिनीची मोठ्या प्रमाणावर विनापरवाना विक्री ; वरिष्ठ अधिकाऱ्यांचा कानाडोळा
सांगोला शहर व तालुक्यातील इनाम वर्ग - २ च्या असणाऱ्या हजारो एकर जमिनीपैकी शेकडो एकर जमीनीची शासनाची कोणत्याही प्रकारची पूर्व परवानगी न घेता खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात झालेली आहेत.सांगोला तालुक्यात असणाऱ्या सरकारी जमिनी पैकी काही जमीन वेगवेगळ्या अधिनियमां अंतर्गत नागरिकांना नियम,अटी घालून नविन शर्तीने वाटप करण्यात आल्या होत्या. सदर जमिनीची इनाम वर्ग-२ म्हणून महसूल रेकॉर्डला नोंद असणे अपेक्षित होते.परंतु सांगोला तालुक्यातील तत्कालीन महसूल कर्मचाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे या सरकारी जमिनीची च्या भोगवटदार वर्ग-१ म्हणून नोंद झालेली आहे.तसा अंमल ऑनलाईन / डिजिटल ७/१२ उताऱ्यावर झालेला आहे. शासनामार्फत वेळोवेळी ७/१२ दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर करण्यात आले. परंतु सांगोला तालुक्यातील विद्यमान महसूल कर्मचारी,अधिकाऱ्यांनी इनाम वर्ग-२ च्या जमिनीची इनाम वर्ग-१ म्हणून ऑनलाइन, डिजिटल ७/१२ उताऱ्यावर झालेल्या नोंदीची चुकीची दुरुस्ती केलेली नाही.भोगवटदार वर्ग-२ च्या जमिनीची भोगवटदार वर्ग-१ अशी नोंद ऑनलाइन,डिजिटल सातबारा उतारावर झाल्याने या संधीचा अनेक नागरिक गैरफायदा घेत आहेत.व शासनाची कोणतीही परवानगी न घेता शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवून मा. दुय्यम निबंधक साहेब यांच्याशी हातमिळवणी करून मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्रीचे दस्त नोंदणी केले जात आहेत.त्यामुळे शासनास नजराण्यापोटी मिळणा-या लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तरी वरिष्ठ अधिकारी यांनी सदर प्रकरणी तातडीने लक्ष घालून सांगोला तालुक्यात असणाऱ्या भोगवटदार वर्ग-२ च्या जमिनी परंतु सध्या ऑनलाइन,डिजिटल ७/१२ उताऱ्यावर भोगवटदार वर्ग-१ अशी नोंद असणाऱ्या जमिनीचे ७/१२ उतारे तात्काळ दुरुस्त करून भोगवटदार वर्ग-२ अशी नोंद करण्यात यावी अन्यथा अश्या प्रकारे विनापरवाना खरेदी-विक्रीचे दस्त नोंदणी सुरूच राहतील
0 Comments