दुर्दैवी घटना! विजेची तार अंगावर पडून एकाचा जागीच मृत्यू; सोलापूर जिल्ह्यातील घटना सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ शहरातील समर्थ नगर जवळील शारदा नगर येथे अंगावर विजेची तार पडून एकाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली.याबाबत अधिक माहिती अशी, की मोहोळमधील वाढीव भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शारदा नगर येथे मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास वसंत आप्पा कोळी (वय 50) हे आपल्या स्वत:च्या घराच्या गच्चीवर उभारले असताना अचानक घरावरील विद्युत वाहिनीची तार त्यांच्या अंगावर पडली.
यावेळी ते खाली कोसळले. तत्काळ मुलगी स्वप्नाली वसंत कोळी व पत्नी प्रमिला वसंत कोळी यांनी त्यांना खासगी ऍम्ब्युलन्स बोलावून उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात आणले.वैद्यकीय अधिकारी डॉ.गायकवाड यांनी बेशुद्ध अवस्थेत आणलेल्या वसंत आप्पा कोळी यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याचे सांगितले.सुदैवाने याच वेळी घराच्या खाली उभी असलेली वसंत आप्पा कोळी यांच्या मुलीच्या अंगावरील गाऊनला तार स्पर्श करून गेल्याने तिच्या कपड्याला झळ बसली परंतु मुलीला इजा पोचली नाही. याचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.


0 Comments