सांगोला पुरवठा विभागातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर ; ५० रुपयाच्या रेशनकार्ड साठी मोजावे लागतात ३१० रुपये !
सांगोला येथील पुरवठा विभागात गेल्या अनेक महिन्यापासून तालुक्यातील नागरिकांना नाहक त्रास देवून राजरोसपणे भ्रष्टाचार केला जात आहे. दुबार, नवीन रेशनकार्ड साठी ५०,६० रुपये फि असताना दुबार, नवीन रेशनकार्ड साठी पुरवठा विभागातील कर्मचारी ३१० रुपयाचे चलन भरून घेत आहेत. नागरिकांना ३१० रुपयांचे चलन हे खाजगी ई-सेवा केंद्रात भरून देण्यासाठी ४० रुपये द्यावे लागतात एक रेशनकार्ड मिळवण्यासाठी नागरिकांना ३५० रुपये मोजावे लागतात.
रेशनदुकानदार यांचे मार्फत नागरिकांना देण्यात येणाऱ्या दुबार, नवीन रेशनकार्ड साठी ३१० रुपयांचे चलन भरून घेतले जात नाही. त्यांच्या कडून ५०,६० प्रमाणे पैसे घेतले जातात. त्यामुळे पुरवठा विभागात सर्वसामान्य जनतेला वेठीस धरून उघडपणे भ्रष्टाचार होत आहे. हि बाब अतिशय गंभीर आहे.या सर्व प्रकारामुळे सांगोला पुरवठा विभागातील कर्मचारी यांचेवर वरिष्ठ अधिकारी यांचे नियंत्रण नसल्याचे स्पष्ट होत आहे. गेल्या काही महिन्यापुर्वी दुबार, नवीन रेशनकार्ड साठी अर्ज केलेल्या नागरिकांकडून पुरवठा विभागातच शासकीय नियमाप्रमाणे ५०,६० रुपये रोखीने घेवून ते शासकीय तिजोरीत जमा केले जात होते.


0 Comments