सांगोला पुरवठा विभागाच्या गलथान कारभारामुळे रास्त भाव धान्य दुकानदारांकडून गरिब कल्याण योजनेच्या मोफत धान्याची बेकायदेशीर विक्री ?सांगोला तालुक्यातील १५५ रास्त भाव धान्य दुकानात कोरोना काळात प्रधानमंत्री गरिब कल्याण योजनेअंतर्गत अन्नसुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत वाटप करण्यासाठी आलेल्या मोफत धान्य वाटपात मोठा भ्रष्टाचार झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सांगोला शहरातील एका संस्थेच्या रेशन दुकान मधून काही टन रेशनिंगच्या गहू,तांदळाची बेकायदेशीर विक्री करण्यात आली आहे. सदरची घटना या संस्थेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. असे बोलले जात आहे.परंतु सदर संस्थेच्या रास्त भाव धान्य दुकानावर पुरवठा विभागाकडून अद्यापही कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. रेशनच्या धान्याचा भ्रष्टाचार करणाऱ्या रास्त भाव दुकानदार यांना पुरवठा विभाग पाठीशी तर घालत नाही ना ? अशी जोरदार चर्चा सांगोला शहरात सुरू आहे कोरोना काळात रेशनकार्ड धारकांना मोफत वाटप करण्यासाठी आलेल्या एकूण धान्यापैकी वाटप करून ऑक्टोबर २०२० मध्ये शिल्लक राहिलेले धान्य तालुक्यातील अनेक रेशन धान्य दुकानदार यांनी नोव्हेंबर २०२० या महिन्यात अन्नसुरक्षा योजनेच्या रेग्युलर रेशनकार्ड धारकांना गहू २ रुपये व तांदूळ ३ रुपये दराने विक्री केल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. या मोफत धान्याची विक्री रेशनकार्ड धारकांना केल्याची कुणकुण सांगोला पुरवठा विभागास लागली आहे. परंतु पुरवठा विभाग या दुकानदारांवर कारवाई करण्याच्या मनस्थितीत नसल्याचेच दिसत असून पुरवठा विभागात कागदी घोडे नाचवले जात आहेत.त्यामुळे पुरवठा विभाग ज्या ज्या रेशन धान्य दुकानदार यांनी मोफत धान्याची विक्री केली आहे. अशा धान्य दुकानदाराचा शोध घेवुन कारवाई करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


0 Comments