पैशासाठी 'तिने' केले आठ जणांशी बनावट लग्न !लग्नाचे नाटक करायचे आणि खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत खंडणी वसूल करायची असा अजब प्रकार उघडकीस आला आणि अनेकांना धक्का बसला !
'तिने' पैशासाठी केली बनावट आठ लग्न बीड : बनावट लग्न करायचे आणि बलात्काराची धमकी देत खंडणी वसूल करण्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले असून एका तरुणींनी अशा प्रकारे आठ जणांना फसवले असल्याचे उघडकीस आले आहे.
लग्नाच्या निमित्ताने फसवणूक होण्याचे वेगवेगळे प्रकार समोर आले आहेत पण लग्नही बनावट करण्याचा नवा फंडा एका तरुणीने शोधून काढला आहे तरुणाशी लग्न करून त्याच्याकडून पैसे उकळणे आणि नंतर पसार होण्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांनी पकडला आहे. आष्टी तालुक्यातील शिराळ गावाच्या एका तरुणाशी विवाह केल्यानंतर महिलेचे वेगळेच रूप पाहायला मिळाले. लग्नानंतर खुशीत असलेल्या नवरोबाला आनंदापेक्षा अजब संकटाचा सामना करावा लागला. लग्नानंतर या महिलेने आपल्या नवऱ्याला वेगळ्याच धमक्या द्यायला सुरुवात केली. 'दोन लाख रुपये दे, नाहीतर मला फसवून आणले आहे आणि माझ्यावर बलात्कार केला आहे' असा खोटा गुन्हा दाखल करीन अशी धमकी या नव्या नवरीने दिली. या प्रकाराने नवरोबाची झोप उडाली.
लग्नाच्या निमित्ताने आपली फसवणूक झाली आहे हे त्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने थेट पोलीस ठाणे गाठले आणि सगळा प्रकार पोलिसांच्या कानावर घातला. नेहमीपेक्षा वेगळी तक्रार ऐकून पोलिसही चक्रावले. आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांनी सापळा लावला. या प्रकरणात सदर महिला आणि एक साथीदार पुरुष याना पन्नास हजार रुपये घेताना पंचासमक्ष पकडण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता अशा प्रकारे आठ जणांशी बनावट लग्न करून त्यांच्याकडून अशाच प्रकारे धमकी देऊन खंडणी वसूल केल्याचे समोर आले. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अनेक बनावट लग्नाचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. खंडणी वसूल करणारे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


0 Comments