google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भावी नगरसेवकांची तयारी जोरात व्हॉटस्अॅप व फेसबुक बनले प्रचाराचे व्यासपीठ

Breaking News

नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भावी नगरसेवकांची तयारी जोरात व्हॉटस्अॅप व फेसबुक बनले प्रचाराचे व्यासपीठ

 सांगोला ( प्रतिनिधी ) : - सांगोला नगरपालिका निवडणुकीसाठी अजून ६-७ महिन्यांचा कालावधी असला तरी निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत.नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भावी नगरसेवक इच्छुकांची तयारी जोरात सुरू झाली आहे . फेस बुकवरील पोस्ट आणि व्हॉट्सअॅप स्टेटस माध्यमातून प्रचाराची मूहूर्तमेढ रोवली आहे .


हिंदी , मराठी गाणी व अॅनिमेशन वापरून इच्छुक निवडणुकीत उतरण्याचा आपला मानस व्यक्त करीत आहेत . मोबाईल स्क्रीन हेच भावी उमेदवारांच्या निवडणुकीचे व्यासपीठ बनले आहे . सांगोला नगरपालिका उपनगराध्यक्ष पदाची निवडणुक नुकतीच संपन्न झाली . या निवडणुकीमध्ये आघाडीत बिघाडी झाल्याने शेकाप , भाजप व आनंद माने गटाचे प्रशांत धनवजीर यांनी निवडणुकीत विजय मिळवून उपनगराध्यक्ष पद मिळविले . उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीनंतर सांगोला नगरपालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीसंदर्भात शहरात सध्या बऱ्याच बारीक सारीक हालचाली सुरु आहेत . त्यामुळे येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीच्या धर्तीवर प्रत्येक पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून गाठीभेठी घेण्यासाठी जोर दिला आहे . सांगोला तालुक्याच्या प्रत्येक निवडणुकीत प्रचाराचे तंत्र बदलते आहे . एकेकाळी सार्वजनिक भिंती रंगवणे हे प्रचाराचे तंत्र होते . कार्यकर्त्यांची कल्पकता त्या भितीवरून दिसत होती . असे भिती रंगवणारे त्यावेळचे कार्यकर्ते आता राजकारणात मोठया पदावर आहेत . त्यानंतर पत्रके वर्तमानपत्रातील जाहिराती हे प्रचाराचे मुख्य माध्यम बमले . त्यानंतर डिजिटल बॅनरवरून प्रचार रंगू लागला . वृत्तवाहिन्यांवरील जाहिरांतीनीही एक काळ मतदारांना आकर्षित केले . या सगळ्या स्थित्यंतरानंतर सोशल मीडियाने निवडणूक प्रचाराची सर्व सूत्रे आपल्या हातात घेतली आहेत . सहा - सात वर्षापूर्वी लोकसभा , विधानसभा निवडणुकीत सोशल मीडियावरून जोरात प्रचार झाला . नेत्यांच्या खाद्याला खादा लावून कार्यकर्तेही सोशल मीडियावरून प्रचारात अॅक्टीव्ह झाले . परस्परांचे उनीधुनी काढण्याची एकही संधी त्यांनी सोडले नाही . गेल्या नगरपालिका निवडणुकीतही सोशल मीडियाच प्रचारात आघाडीवर होता . यंदाही निवडणुकीत सोशल मीडियाचाच बोलबाला आहे . नगरपालिका निवडणुकीसाठी अद्याप बराच वेळ आहे . तरीही इच्छुकांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे . प्रचाराचा पहिला टप्पा म्हणजे आपल्या नावाची घोषणा करणे हा असतो . यासाठी त्यांनी ' फेसबूक पोस्ट आणि व्हॉटसअॅप स्टेटसचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला आहे . फेसबुक वव्हॉटसअॅपचा कौशल्याने वापर करून त्यांना आपल्या नावाची आपल्या प्रभागात चर्चा सुरू केली . यासाठी स्वतचा एखादा व्हिडिओ बनवून तो व्हायरल केला जात आहे . यासाठी ' तु चाल पुढे तुला भीती कुणाची , मनकर्णिका चित्रपटातील ' विजयी भव ' ही गाणी सर्वाधिक वापरली गेली , वेगवेगळे व्हिडिओहा सध्या सांगोला शहरात चर्चेचे विषय ठरला आहे.नेत्यांची छायाचित्रे लावून अनेकांनी आपली राजकीय दिशाही स्पष्ट केली . व्हॉटसअॅप स्टेटसवरही असे हिडिओ सध्या दिसत आहेत . मोबाईल टिझर , इन्स्टाग्राम व्हिडिओंच्या माध्यमातून इच्छुकांना मतदारांना आकर्षित करण्यास सुरुवात केली आहे . प्रत्यक्ष प्रचारातही याचाच प्रभाव अधिक असणार आहे . एकूणच सध्या व्हॉटस्अॅप व फेसबुक सांगोला नगरपालिकेच्या भावी नगरसेवकांसाठी उमेदवारीच्या प्रचाराचे व्यासपीठ झाले आहे . क्षमता व बारकावे ओळखून जर प्रचार केला गेला तरच तो परिणामकारक होणार असून सोशल मीडियाच्या माध्यमाला चांगल्या कंटेटची जोड देणे आवश्यक आहे .

Post a Comment

0 Comments