महूद : महावितरण कंपनीच्या विजेची चोरी केल्याप्रकरणी महूद ता. सांगोला उपविभागामधील घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांवर सुमारे पाच लाख रुपयांची वीज चोरीचा गुन्हा पोलिसांत दाखल करण्यात आला आहे.
महावितरण कंपनीच्या महूद उपविभागाचे सहाय्यक अभियंता बाळकृष्ण खरात यांनी याबाबत माळशिरस पोलिस ठाण्यात या व्यावसायिक व औद्योगिक वीज वापरकर्त्यांच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे. तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, महावितरण कंपनीतील इतर सहकारी व पंच यांच्यासह महूद उपविभागातील विविध गावांना भेटी दिल्या होत्या. त्या वेळी आम्ही घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांच्या वीज जोडणीची तपासणी करत होतो. त्या वेळी या ग्राहकांनी अनाधिकृतपणे वीज चोरी केल्याचे आढळून आले होते. यामध्ये महूद अंतर्गत असलेल्या ढाळेवाडी येथील सीताराम नारायण ढाळे यांनी 675 युनिटची वीज चोरी केली असून या वीज चोरीची रक्कम 24 हजार 490 रुपये आहे. मरयानी नागप्पा मुतगेकर यांनी 3569 युनिटची वीज चोरी केली असून या वीज चोरीची रक्कम 51 हजार 800 रुपये आहे. प्रशांत उत्तमराव सावंत यांच्या सावंत हॉस्पिटलमध्ये 1769 युनिटची वीज चोरी उघडकीस आली असून या वीज चोरीची रक्कम 26 हजार 560 रुपये आहे. सुरेश उत्तरेश्वर शिंदे यांच्या अकलूज रस्त्याच्या कडेला असलेल्या व्यावसायिक वीज जोडमध्ये पाच हजार 931 युनिटची वीज चोरी उघडकीस आली असून या वीज चोरीची रक्कम एक लाख 63 हजार 750 रुपये आहे. लोटेवाडी येथील प्रकाश गोरख लवटे यांच्याकडे सहा हजार 714 युनिटची वीज चोरी आढळून आली असून या वीज चोरीची रक्कम एक लाख 990 रुपये इतकी आहे. तर लोटेवाडी येथील डिजिटल फ्लेक्स प्रिंटिंग प्रेस उपकरण असलेल्या लहू राजाराम सरगर यांच्याकडे चार हजार सात युनिटची वीज चोरी आढळली असून त्याची रक्कम एक लाख 22 हजार 570 रुपये आहे. अशाप्रकारे या सहा ग्राहकांकडे एकूण 22 हजार 665 युनिटची वीज चोरी आढळली असून वीज चोरीची एकूण रक्कम चार लाख 99 हजार 70 रुपये इतकी आहे. वीज चोरीसाठी वापरलेला मुद्देमाल जप्त करून शाखा कार्यालयात ठेवलेला आहे. महावितरण महूद उपविभाग कार्यालयांतर्गत घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक सात ग्राहकांवर एकाच वेळेस माळशिरस पोलिसांत गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.


0 Comments