सांगोला ( प्रतिनिधी ) : पोलिस दलात पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांची चांगला , धडाडीचा , व्हिजन असलेला आणि काही तरी नवे करून दाखविण्याची धमक असलेला अधिकारी अशी प्रतिमा आहे . आजवरच्या सेवेत त्यांच्या अतुलनीय कामगिरीने त्यांची प्रतिमा अधिक उजळून निघाली आहे . सांगोला तालुक्याचा चेहरामोहरा ते नक्कीच बदलतील , अशी नागरिकांना अपेक्षा असून त्यांच्यासमोर मात्र तालुक्यातील आव्हानाचा मोठा डोंगर उभा आहे
. सांगोला पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक म्हणून पोनि.भगवान निंबाळकर यांनी काल पदभार स्वीकारला आहे . पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्याकडून त्यांनी सूत्रे हाती घेतली असून पोनि.निंबाळकर यांच्यापुढे तालुक्यातील शासनाने घालून दिलेल्या उपाययोजनांची कणखरपणे अंमलबजावणी करण्याचे आव्हान उभे आहे . शांतताप्रिय तालुका म्हणून सांगोल्याची एक वेगळी ओळख आहे . परंतु गेल्या काही वर्षात तालुक्यातील गुन्हेगारीचा आलेख वाढत आहे . आलेख वाढत असतानाच पोलीस निरीक्षक म्हणून भगवान निंबाळकर यांच्याकडे तालुक्याचा पदभार सोपविण्यात आला आहे . तेव्हा नव्याने बदलून येणाऱ्या अधिकाऱ्यांसमोर आव्हाने कायम असून , कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे . असमाजिक तत्वांवर लगाम घालणे , जनसामान्यांमध्ये 'पोलीसांची प्रतिमा मलीन न होवू देणे , चोऱ्या , मोटार सायकल चोऱ्या , वादविवाद , तंटे , भांडण थांबविण्यासाठी मोठ्या प्रमाणात लक्ष द्यावे लागणार आहे . तालुक्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान पोनि.निंबाळकर यांच्यासमोर असणार आहे . त्याचप्रमाणे किरकोळ आणि संघटित गुन्हेगारीचे प्रमाणही अलीकडे वाढले आहे . सांगोला तालुक्यात ' किरकोळ ' या सदरात मोडणारी ही गुन्हेगारी असली तरी ती दुर्लक्ष करण्याजोगी नाही . सध्या असलेल्या पोलीस वळातून कायदा - सुव्यवस्था आणि चोख सुरक्षा व्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान पोलीस निरीक्षक भगवान निंंबाळकर यांच्यापुढे आहे . याशिवाय , गेल्या काही वर्षांत चोरीच्या घटनांचा आलेख उंचावला असून या घटनांमुळे नागरिक हैराण झाले आहे . कमी मनुष्यबळामध्ये तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे हे ही त्यांच्यापुढे आव्हान असणार आहे . कर्मचाऱ्यांवर धाक ठेवण्याचे व कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करणे नूतन पोलीस निरीक्षकांना क्रमप्राप्त ठरणार आहे . घरफोड्या चोऱ्यांना आळा घालण्यासाठी रात्री पोलिस गस्त वाढवावी लागणार आहे . चिरीमिरी घेण्याचे प्रमाणही अधिक असून किरकोळ कारणासाठी चिरीमिरी घेणाऱ्यांना धडा शिकवण्याचे धाडसही त्यांना दाखवावे लागणार आहे .शहरातील वाहनांच्या संख्येत वाढ झाली असून त्या तुलनेत सर्वच शहरातील रस्ते वाहतुकीच्या दृष्टिकोनातून अपुरे पडू लागले आहेत . काही रस्त्यांच्या रुंदीकरणास फारसा वाव राहिलेला नाही . असे असतानाच दररोज नवीन वाहनांची संख्या वाढत आहे . यामुळे शहरातील वाहतूक समस्या ही डोकेदुखी ठरत आहे . त्यामुळे शहरातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी पोनि.निंबाळकर यांना प्रयत्न करावे लागणार आहे . पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांना अनेक गुन्ह्यांचा तपास लावण्यात यश आले असले तरी तालुक्यात वाढती गुन्हेगारी धोकादायक आहे . क्षेत्रफळाने मोठा व शांतताप्रिय सांगोला तालुक्यात वाळू तस्करी , अवैध धंद्यामुळे अनेक प्रश्न उभे आहेत . तरी कायदा - सुव्यवस्थेच्या आघाडीवर जुन्याच असलेल्या दुखण्यावर ते कायमस्वरूपी इलाज कसा शोधून काढतात याकडे आता तालुका वासियांचे लक्ष लागले आहे .


0 Comments