सांगोला ( तालुका प्रतिनिधी ) : आठवडा बाजारासह शहरातील गर्दीच्या ठिकाणी भेटी देऊन मास्क न वापरणाऱ्या , सोशल डिस्टन्सचे पालन न करणाऱ्या तीन हॉटेल , एका मंगल कार्यालयासह ७२ जणांवर दंडात्मक कारवाई करीत २५ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केला .
प्रशासनाने अचानक कारवाईचा बडगा उगारल्याने सर्वांच्या तोंडाला मास्क लावल्याचे चित्र पहावयास मिळाले . सांगोला तालुक्यात कोरोनाचा उद्रेक कमी असल्याने नागरिक बिनधास्त झाले असून मास्क व शारीरिक अंतराचे पालन करण्यात कुचराई करीत आहेत . कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सांगोला प्रशासन अलर्ट झाले असून रविवारी आठवडा बाजारासह गर्दीच्या ठिकाणी नगरपालिका , महसूल व पोलीस विभागाने संयुक्त मोहीम राबवली आहे . मास्क न वापरणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे .कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सांगोला शहरात आस्थापना तपासणी व नागरिकांवर मास्कची कारवाई करण्यासाठी पोलीस स्टेशन , महसूल विभाग , नगरपरिषद व इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांची पथके नेमली आहेत . रविवारी शहरातील विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत तीन हॉटेल , एका मंगल कार्यालयासह ७२ जणांकडून २५ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केला आहे . नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक संजय दौडे , लेखापाल जितेंद्र गायकवाड , तलाठी हरिश्चंद्र जाधव , पो.ना. पवार , पो.ना. बनसोडे , नगरपालिका कर्मचारी निलेश कांबळे , किरण धनवजीर , सनी बाबर , सनी कांबळे , अविराज माने यांनी कारवाई केली . घराबाहेर निघताना मास्क घालुनच घरा बाहेर निघावे , शारीरिक अंतराचे पालन करावे , व्यापारी बांधवांनी मास्क वापरून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे


0 Comments