जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाचा अर्ज माघारीचा टप्पा सोमवारी पार पडणार आहे. गावातील राजकारणाची दिशा ठरविण्यासाठी आवश्यक ती ‘सेटलमेंट’करण्याची शेवटची संधी पॅनेलप्रमुखांना उरली आहे. अपक्ष आणि विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केलेल्यांची मनधरणी करण्यासाठी पॅनेलप्रमुखांची धडपड सुरु झाली आहे. कोणत्या पध्दतीने विरोधी उमेदवार आपल्या गळाला लागतील यासाठीचे शर्तीचे प्रयत्न सुरु झाले आहेत.
ग्राम पंचायत निवडणुकीत सोमवार, 4 जानेवारी रोजी अर्ज माघारी घेण्याचा शेवट दिवस आहे. विरोधीतील उमेदवार कमी करण्याबरोबरच आपल्या बाजूने मतदार वळविण्यासाठी पॅनेलप्रमुखांना ही शेवटची संधी असते. या टप्प्यावर अनेकवेळा मोठमोठ्या ‘सेटलमेंट’ होतात. अनेकांना पुढील निवडणुकीत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले जाते तसेच काहीजणांना दुसर्या वॉर्डात मदत करण्याची तयारी ठेवली जाते. काहींना आमिष दाखवून निवडणुकीत माघार घेण्यास भाग पाडले जाते. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेतील हा महत्त्वाचा टप्पा मानला जातो. रविवारी दिवसभर वरिष्ठ नेतेमंडळी तसेच गावातील
पॅनेलप्रमुखांनी बंडखोरी केलेल्या लोकांना उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठीची मनधरणी सुरु केली.
उद्यापासून प्रचाराचा धडाका
अर्ज माघारीची वेळ सोमवारी दुपारी 3 वाजेपर्यंतची आहे. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी अंतिम उमेदवारांची यादी जाहीर करणार आहेत. त्यानंतर चारनंतर निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. त्यानंतर निवडणुकीच्या रिंगणात असणार्या उमेदवारांचे चित्र स्पष्ट होणार आहे. मंगळवारपासून गावागावात प्रचारास प्रारंभ होणार आहे. सुमारे 10 दिवस प्रचार रंगणार आहे.


0 Comments