सांगोला ( तालुका प्रतिनिधी ) : तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाबाबतची उत्कंठा शिगेला पोहोचली असून आज सोमवार १८ जानेवारी रोजी सर्वांचे लक्ष लागून राहिले असून , उमेदवार , कार्यकर्त्यांची धडधड वाढू लागली आहे . ५६ ग्रामपंचायतीच्या ५३ ९ जागांसाठी नशीब आजमावणाऱ्या १२७ ९ उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला आज होणार आहे . उमेदवारांनी आपलाच विजय होणार असल्याचा अंदाज वर्तविला असला तरी जनतेने विजयाचा गुलाल उधळण्याची संधी कोणाला दिली , हे आज अधोरेखित होणार आहे . अत्यंत चुरशीने झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी आज होणार असून विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार तर पराभवाची संक्रांत कोणावर बसणार ? हे आज स्पष्ट होणार आहे आजच्या निकालानंतर गावगाड्याच्या सत्तेची चावी कुणाकडे जाणार आणि कोण विरोधीबाकावर बसणार हे स्पष्ट होणार आहे . या निकालानंतर कुणी नाराज होईल तर कुणाच्या गळ्यात विजयाची माळ पडेल . गावगाड्याच्या निवडणुकीत पायतीचे जिंकण्याच्या इर्षेने घराची तिजोरी मोकळी केली .
त्यामुळे तिळगुळाची गोडी कोणाला लाभणार , रग्गड खर्च करूनही कोणावर पराभवाची संक्रांत बसणार ? याचे चित्र आज स्पष्ट होईल . निवडणुकीत विजयासाठी देव पाण्यात ठेवलेल्या उमेदवारांची धाकधूक वाढली आहे . ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे . २५ टेबलवर मतमोजणीच्या अकरा फेऱ्या होणार असून दुपारी एक वाजेपर्यंत संपूर्ण निकाल हाती येणार आहे . गावकऱ्यांनी कोणाला सत्ताधारी केले तर कोणाला सत्तेपासून दूर ठेवले ? याचा फैसला आज होणार आहे . दोन्ही गटाचे कार्यकर्ते विजयाचा दावा करत असले तर एकालाच विजयाचा गुलाल उधळण्याची संधी मिळणार हे मात्र निश्चित आहे .


0 Comments