चालकाचा ताबा सुटला अन् ट्रॅक्टर ट्रॉलींसह भीमा नदीत कोसळला ; चालक गंभीर जखमी; “बळिराजा’चा आंदोलनाचा इशारा
कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्यावरून जड वाहतूकीसाठी बंदी असताना ही सुरू आहे जड वाहतूक
पंढरपूर : : खेडभोसे (ता. पंढरपूर) येथून ऊस घेऊन जाणारा ट्रॅक्टर पटवर्धन कुरोली (ता. पंढरपूर) येथील बंधाऱ्यावरून भीमा नदीच्या पात्रात कोसळला. यामध्ये चालक सतीश कडाळे (रा. भोसे, ता. पंढरपूर) हा गंभीर जखमी झाला आहे.
मंगळवारी (ता. 15) दुपारी अडीचच्या सुमारास हा ट्रॅक्टर बंधाऱ्यावरून जात होता. या वेळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. यामध्ये ट्रॅक्टर व दोन ट्रॉलींसह उसाचे मोठे नुकसान झाले आहे.
खेडभोसे येथील शेतकरी धनाजी विठ्ठल साळुखे यांचा हा ट्रॅक्टर असून, तो ऊस घेऊन पांडुरंग सहकारी साखर कारखान्याकडे जात होता. पटवर्धन कुरोली बंधाऱ्यावर आल्यानंतर दोन्ही ट्रेलरमध्ये मोठ्या प्रमाणात ऊस भरल्याने उतारावर चालकाचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटला. त्यामुळे तो सरळ बंधाऱ्यावरून भीमा नदीच्या पात्रात पडला. या ट्रॅक्टरचे अंदाजे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ट्रॅक्टर चालक बराच काळ उसाने भरलेल्या ट्रॉलीखाली अडकून पडला होता. अपघात झालेला पाहून बंधाऱ्यावरून ये-जा करणाऱ्या लोकांनी त्याला बाहेर काढले. त्याच्यावर पंढरपूर येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.
बंधाऱ्यावरून जड वाहतुकीसाठी बंदी असताना सुद्धा येथून मोठ्या प्रमाणात मुरूम, खडी, ऊस वाहतूक केली जाते. या वाहतुकीमुळे या बंधाऱ्यावर अनेक वेळा अपघात घडले आहेत. या बंधाऱ्यावरील जड वाहतूक बंद करावी यासाठी येथील अनेक सामाजिक संघटनांनी निवेदनेही दिली आहेत; मात्र प्रशासनाने अद्यापही लक्ष घातलेले नाही.
बळिराजा संघटना आक्रमक
या बंधाऱ्यावरून वाळू, खडी, मुरूम व दगड आदींचे वाहतूक होत आहे. यामुळे बंधाऱ्याला धोका निर्माण झाला आहे. या वाहतुकीमुळे बंधाऱ्याला भेगा पडलेल्या आहेत. या बंधाऱ्यावर पोलिसांचा बंदोबस्त ठेवावा. जड वाहतूक बंदी करावी, अशी मागणी वेळोवेळी पाटबंधारे विभागाकडे करूनही याकडे डोळेझाक करण्यात येत आहे. जड वाहतूक बंद न केल्यास बळिराजा शेतकरी संघटना व ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन उभारले जाईल.
– ज्ञानेश्वर जवळेकर,



0 Comments