भोगवटा वर्ग २’ जमिनी रूपांतरणावरील स्थगिती मागे
मुंबई : वृत्तसंस्था
‘भोगवटा वर्ग 2’ जमिनीच्या ‘भोगवटा वर्ग 1’ जमिनींमध्ये रूपांतरण करण्यावरील स्थगितीचा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागे घेतला आहे. भोगवटा वर्ग 2 या जमिनी सामान्यपणे जिल्हाधिकार्यांच्या जमिनी म्हणून ओळखल्या जातात. या महसुली जमिनीच्या रूपांतरणासाठी, स्वरूपातील बदलासाठी जिल्हाधिकार्यांची पूर्वपरवानगी आवश्यक असते.
मागील आठवड्यात या जमिनीच्या रूपांतरणावर स्थगिती आणली गेली होती. रूपांतरण सुलभ करण्याच्या शासकीय आदेशाचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी आल्याने हा निर्णय घेण्यात आला होता. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील वर्षी रूपांतरण सुलभ केले होते. प्रीमियम फार चढे असल्याने अशा जमिनींवरील भोगवटादारांना (रहिवासी) नव्या नियमाचा कुठलाही लाभ होत नव्हता.
उद्धव ठाकरे यांनी या विषयावर बैठक बोलावली. कुर्ला येथील शिवसेना आमदार मंगेश कुडलकर यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता. कुडलकर यांच्या मागण्या तसेच गृहनिर्माण विषयाशी संबंधित विविध मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली.
कुडलकर म्हणाले, मुंबईतील जवळपास 3 हजार गृहनिर्माण सोसायट्या या जिल्हाधिकार्यांच्या अखत्यारीतील जमिनींवर (‘भोगवटा वर्ग 2’ प्रकारातील) आहेत. बहुतांश सोसायट्या माझ्याच मतदारसंघात आहेत. गेल्या 40/50 वर्षांपासून निम्न मध्यमवर्गीय लोक या सोसायट्यांतून रहिवासाला आहेत. या सोसायट्या खूप जुन्या आहेत. इमारती जीर्ण झाल्या आहेत. त्या पुन्हा नव्याने बांधणे गरजेचे झाले आहे.
आमच्या द़ृष्टीने रूपांतरणाच्या वाटेतील अडसर दूर करणे प्राधान्याचे होते. तसे घडलेले आहे. विदर्भात अशा जमिनींच्या हस्तांतरणावर प्रीमियम 5 टक्के आकारला जातो. इथे मात्र तो 10 ते 25 टक्क्यांच्या घरात आहे. विदर्भाप्रमाणेच तो सर्वत्र आकारला जावा, त्यासाठी आमचे प्रयत्न चाललेले आहेत, असेही कुडलकर यांनी सांगितले.
मुख्यमंत्री कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हाडाच्या 56 सोसायट्यांवरील सेवा कराबाबतही पुनरावलोकन केले जाईल. त्याबाबतच्या प्रस्तावाचा मसुदा तयार करून तो पुढील कार्यवाहीसाठी सरकारकडे सत्वर सादर करावा, असे आदेश मुख्यमंत्री ठाकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाने भोगवटादार वर्ग 2 प्रकारातील मालमत्ताधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.


0 Comments